सामाजिक अंतर पाळा, कोरोनाची साखळी खंडित करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:46 AM2020-04-22T00:46:55+5:302020-04-22T00:47:36+5:30
एका रुग्णामुळे शहरात सुमारे १९९ जणांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल, ही साखळी खंडित करण्यासाठी सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘कोरोनाची साखळी कशी खंडित होणार?’ या विषयावर ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी मंगळवारी नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या जगभर कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे एक रुग्ण चारशे ते एक हजार लोकांना कोरोनाबाधित करू शकतो. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करायची असेल तर यासाठी कोणत्याही दोन व्यक्तींनी एकत्र येण्यापासून रोखणे आवश्यक आहे. घरातही दोन व्यक्तींमध्ये किमान पाच फुटांचे अंतर राखणे गरजेचे आहे. नागपुरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येला अशाच संसर्गाची पार्श्वभूमी आहे. एका रुग्णामुळे शहरात सुमारे १९९ जणांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल, ही साखळी खंडित करण्यासाठी सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘कोरोनाची साखळी कशी खंडित होणार?’ या विषयावर ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी मंगळवारी नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.
कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र अजूनही बहुतांशी लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास कोरोनापासून बचावाचा उत्तम उपाय घरी राहणे हाच आहे. कोरोना संशयित आढळल्यानंतर त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी संशयिताच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांची संपूर्ण ‘हिस्ट्री’ शोधून त्यांनाही ‘क्वॉरंटाईन’ करणे का आवश्यक आहे, ही सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत त्यांनी दिली. यासह नागरिकांकडून विचारण्यात येणाºया प्रश्नांचेही त्यांनी सोप्या भाषेत समाधान केले.
...तर ५०० रुपये दंड
भाजी विक्रेते असो अथवा सामान्य नागरिक घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे बंधनकारक आहे. शहरात कुणीही मास्कविना आढळल्यास त्याच्याकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचा विचार मनपा प्रशासन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.‘मॉर्निंग’ आणि ‘इव्हिनिंग वॉक’ करणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
बालकांच्या लसीकरणासंदर्भात नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा
सध्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आल्याने बालकांच्या लसीकरणासाठी काही सुविधा करण्यात आली आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, लॉकडाऊन असले तरी बालकांना विहीत कालावधीमध्येच लसीकरण व्हावे यासाठी मनपा तत्पर आहे. ज्या बालकांना लसीकरण द्यायचे असेल त्यांनी मनपाच्या नियंत्रण कक्षामध्ये ०७१२-२५६७०२१, २५५१८६६, २५६२४७४ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले.