दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशपरदेशातून आले अनुयायी
By सुमेध वाघमार | Published: October 23, 2023 08:02 PM2023-10-23T20:02:08+5:302023-10-23T20:03:14+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले.
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. हजारो वर्षे दारिद्यांच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेऊन बुद्ध तत्त्वज्ञानाला समाजमनात रुजविण्याचे क्रांतीदर्शी कार्य पूर्ण केले. त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी. सोमवरी सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरुप आले. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला. जय बुद्ध व जयभीमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर निणादत होता.
हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर रात्री उशीरापर्यंत उतरत होते. देशाच्या कानाकोपºयातूनच नव्हे तर नेपाळ, थायलॅण्ड, जापान, श्रीलंका येथूनही अनुयायी दीक्षाभूमीवर आले आहेत. मंगळवारी लाखो अनुयायांच्या गर्दीने दीक्षाभूमी फुलून गेली. युवकांच्या झुंडीच्या झुंडी ‘जयभीम’चा नारा देत गर्दीत शामील होत होती. गर्दी अफाट असली तरी सर्वच एकमेकांना सांभाळून घेत होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांची भाषा विविध असली तरी ‘जयभीम’ या एकाच शब्दाने मदतीचा हात समोर करीत होते.
अनुयायांच्या सेवेत शेकडो संघटना
हजारो मैलावरु न लाखोंच्या संख्येने येणाºया अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या आहेत. पाण्यापासून ते चहा-नाश्ता व दोन वेळच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. काही सामाजिक व वैद्यकीय संघटनांनी वैद्यकीय सेवेसोबतच नि:शुल्क औषधी उपलब्ध करून दिल्या.
९ फूट उंच बाबासाहेबांच्या पुतळ्याने वेधले लक्ष
दीक्षाभूमीवर पुस्तकांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या १५ सेंटीमीटरपासून ते ९ फुटांचे पुतळ्यांचे स्टॉल्स आकर्षण ठरले. प्रसिद्ध शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांनी तयार केलेला संविधान हाती घेऊन समतेचा मार्ग दाखविणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लक्ष वेधून घेणारा होता. या वर्षी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांचे पुतळे स्टॉल्सवर उपलब्ध होते. यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फूले, लोकनायक बिरसा मुंडा, महाराज बसेश्वर, संत नारायण राजगुरु, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे आदींचे पुतळे होते.