हॉटेल, रेस्टॉरंटमधील पदार्थ खाण्यास योग्य आहे का? नागपुरात तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 07:54 PM2021-12-09T19:54:42+5:302021-12-09T19:55:11+5:30
Nagpur News विकण्यात येणारे खाद्यपदार्थ खाण्यास योग्य आहे, यावर अन्न व सुरक्षा मानदे प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे ऑडिट अर्थात तपासणी सुरू आहे.
नागपूर : नागपुरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटलचे कॅन्टिन आणि फुटपाथवर हातठेल्यावर विकण्यात येणारे खाद्यपदार्थ खाण्यास योग्य आहे, यावर अन्न व सुरक्षा मानदे प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे ऑडिट अर्थात तपासणी सुरू आहे. ऑडिटकरिता असलेल्या नियमांचे पालन करीत आहेत वा नाहीत, यावर विभागातर्फे मानांकन देण्यात येणार आहे. मानांकन मिळालेले हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये नागपूरकरांना बिनधास्त खाता येणार आहे.
अंतिम ऑडिटनंतरच मानांकन
प्रथम ऑडिट नागपूर विभागीय अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आणि अंतिम ऑडिट प्राधिकरणाने नेमलेल्या संस्थेतर्फे करण्यात येत आहे. ऑडिट उपक्रमांमुळे लोकांमध्ये खाद्यपदार्थांचा दर्जा, सकस आहार, स्वच्छता, बसण्याची व किचनची व्यवस्था, पाणी आदींसह अनेक बाबतींत जागरूकता येणार आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’ याअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपुरात दिवाळीनंतर तपासणीला वेग आला आहे. ‘ईट राईट’ मोहिमेत शाळा, कॉलेज, हॉस्पिटलच्या कॅन्टिनचा परिसर खाण्यास योग्य आहे का, यावर तपासणी करण्यात येत आहे.
याशिवाय ‘ईट राईट स्कूल’ मोहिमेत शाळेतील मुलांना स्वच्छ जागेत भारतीय खाद्यपदार्थ मिळत आहेत का, याची तपासणी सुरू आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी कसे राहील, यावर भर आहे. तसेच क्लिन फ्रूट, व्हेजिटेबल मार्केटमध्ये कळमना, कॉटन मार्केट, गोकुळपेठ मार्केटमधून १५० नमूने घेण्यात आले आहेत. तसेच ऑडिटनंतर ५२ हॉटेल्सला स्टार मानांकन दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांनी दिली. हा उपक्रम सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हातठेलेवाल्यांना प्रशिक्षण
देशपांडे म्हणाले, याशिवाय ‘क्लिन स्ट्रीट फूड’ अंतर्गत मनपाच्या सहकार्याने हातठेल्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना अधिकृत करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित हातठेल्यावर पदार्थ खाण्यास हरकत नाही, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. याशिवाय हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये खाद्यतेल पुन्हा-पुन्हा तळण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे दिसून येते. अशा ३० ते ३५ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली असून तळलेले तेल शासनातर्फे अधिकृत १३ कंपन्यांना बायो-डिसेलसाठी विकण्याचे त्यांना बंधन टाकले आहे. त्यामुळे नागरिकांना सकस खाद्यपदार्थ मिळेल, हा यामागील उद्देश आहे. तसेच मंदिरात वितरित करण्यात येणारे खाद्यान्न आणि प्रसादाचे ऑडिट करण्यात येत आहे. वाठोड्यातील स्वामीनारायण मंदिरातून नमूने घेतले आहेत.
या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे शहरात पोस्टर लावण्यात आले असून चित्रपटगृहात व्हिडिओ दाखविण्यात येत आहेत. स्वच्छता, स्वच्छ परिसर, सकस आहार लोकांना मिळावा, हा या मोहिमेमागील उद्देश असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.