राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजनातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 09:59 PM2019-03-14T21:59:50+5:302019-03-14T22:35:46+5:30
तिरुअनंतपुरमवरून गोरखपूरकडे जात असलेल्या राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजन केल्यानंतर पोटदुखी, उलटी, अतिसाराचा त्रास सुरु झाला. मार्गात अनेकदा तक्रार करूनही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर नागपुर रेल्वेस्थानकावर या गाडीतील २० ते २५ प्रवाशांना रेल्वे डॉक्टरांनी उपचार पुरविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिरुअनंतपुरमवरून गोरखपूरकडे जात असलेल्या राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजन केल्यानंतर पोटदुखी, उलटी, अतिसाराचा त्रास सुरु झाला. मार्गात अनेकदा तक्रार करूनही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर नागपुर रेल्वेस्थानकावर या गाडीतील २० ते २५ प्रवाशांना रेल्वे डॉक्टरांनी उपचार पुरविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
रेल्वेगाडी क्रमांक १२५१२ तिरुअनंतपुरम-गोरखपूरमधील एस २, एस ३, एस७, एस १० आणि एस ११ कोचमधील प्रवाशांनी बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास जोलारपेट्टई येथे पेंट्रीकारमधून अंडा बिरयानी विकत घेतली. रात्री १२ नंतर या गाडीतील २० ते २५ प्रवाशांना पोटदुखी, उलटी,अतिसाराचा त्रास सुरु झाला. त्यांनी गाडीतील टीटीईला याबाबत तक्रार केली. परंतु मार्गात कुठेही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर गाडीतील टीटीईने नागपूर विभागातील नियंत्रण कक्षाला माहिती दिली. लगेच रेल्वे रुग्णालयाचे प्लॅटफार्मवर हजर झाले. राप्तीसागर एक्स्प्रेस सायंकाळी ५.२० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णांना औषधोपचार केला. या गाडीतील एस २ कोचच्या ४८ क्रमांकाच्या बर्थवरील प्रवासी भुषण रामछेद चौहान (४२) याने रात्री जेवन केल्यानंतर पोट दुखणे सुरु झाल्याचे सांगितले. तर मो. युनुस (१९) या प्रवाशाने भोजन केल्यानंतर उलटी, डोकेदुखीचा त्रास झाल्याची माहिती दिली. यावेळी रेल्वे रुग्णालयाचे डॉ. प्रसन्न फटींग, डॉ. हरीश भुक्या, स्टेशन संचालक दिनेश नागदिवे, उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव, राजु इंगळे, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रविण रोकडे, आरपीएफचे सहायक सुरक्षा आयुक्त दिपकसिंग चौहान, निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजीद शेख उपस्थित होते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पेंट्रीकारमधील अन्नाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले असून या नमुन्यांची तपासणी केल्यावर अन्न दुषित आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. रुग्णांवर उपचार केल्यानंतर सायंकाळी ५.५५ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.