खाद्य प्रक्रिया उद्योगाचा जीडीपीमध्ये १४ टक्के वाटा : मिलिंद कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 11:56 PM2018-11-09T23:56:57+5:302018-11-09T23:59:03+5:30
कृषीमालावार प्रक्रिया करून विक्री केल्यास चांगला नफा मिळविता येतो. खाद्य प्रक्रिया उद्योगात एससी, एसटी नवउद्योजकांना अपार संधी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कृषीमालावार प्रक्रिया करून विक्री केल्यास चांगला नफा मिळविता येतो. खाद्य प्रक्रिया उद्योगात एससी, एसटी नवउद्योजकांना अपार संधी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.
डिक्की विदर्भ चॅप्टरच्यावतीने आणि भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने ‘खाद्य प्रक्रिया उद्योगात एससी, एसटी उद्योजकांना संधी’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर मंत्रालयातील अधिकारी डॉ. जितेंद्र डोंगरे, वरिष्ठ संशोधक डॉ. अजय तुमाने, एलआयटीच्या माजी संचालिका डॉ. प्रतिमा शास्त्री, अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, सिडबीचे महाव्यवस्थापक पी.के. नाथ, डिक्की साऊथ इंडियाचे अध्यक्ष राजा नायक, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष गोपाल वासनिक, उपाध्यक्ष रुपराज गौरी, मराठवाडाचे अध्यक्ष मनोज आदमने, बँकिंग तज्ज्ञ विजय सोमकुंवर, विदर्भ महिला विंगच्या अध्यक्षा विनी मेश्राम उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, खाद्य प्रक्रिया उद्योगाचा जीडीपीमध्ये १४ टक्के वाटा असून इतर उद्योगांच्या तुलनेत सहावे सर्वात मोठे क्षेत्र आहे. देशात आठ कार्यशाळांमधून दहा हजार एससी, एसटी तरुणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. विदर्भात १०० नवे उद्योजक निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. देशात एकूण हजार उद्योजक तयार करण्यात येणार आहे.
डॉ. प्रतिमा शास्त्री यांनी छोटे खाद्य प्रक्रिया उद्योग घरूनच करता येऊ शकतात, यावर माहिती दिली. डॉ. तुमाने यांनी खाद्य प्रक्रिया उद्योगातील घडामोडी आणि नव्या संशोधनाची माहिती दिली. शशिकांत केकरे यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यावर सांगितले. नाथ यांनी खाद्य प्रक्रिया उद्योगासाठी सिडबीच्या अर्थसहाय योजनांची माहिती दिली. निश्चय शेळके, गोपाल वासनिक आणि विनी मेश्राम यांनी एससी, एसटी तरुण-तरुणींना खाद्य प्रक्रिया उद्योगात येण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत क्रांती गेडाम, प्रदीप मेश्राम, गौतम सोनटक्के, मंगेश डोंगरवार, श्रद्धानंद गणवीर, समीर गेडाम, राज मेंढे, संदीप भरणे, रवींद्र घनबहादूर, पंकज सोनोने उपस्थित होते.