कॉसग्रो ॲग्रोमेड मिहानमध्ये २.५ एकरवर उभारणार अन्न प्रक्रिया उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:10 AM2021-09-22T04:10:56+5:302021-09-22T04:10:56+5:30
नागपूर : मिहानमध्ये कॉसग्रो ॲग्रोमेड प्रा.लि. ही अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील मोठी कंपनी सेक्टर-१८ येथे सुमारे २.५ एकर जागा ...
नागपूर : मिहानमध्ये कॉसग्रो ॲग्रोमेड प्रा.लि. ही अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील मोठी कंपनी सेक्टर-१८ येथे सुमारे २.५ एकर जागा मिहान येथील विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) संपादित करीत आहे. या ठिकाणी लवकरच मोठा अन्न प्रक्रिया उद्योग उभारून अन्न व मसाल्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करणार आहे. यासाठी लागणारा शेतीमाल हा विदर्भातील शेतकऱ्यांकडून घेतला जाणार असल्याने, येथील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे नवसंजीवनी मिळेल.
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने मिहानमध्ये कृषिपूरक उद्योगांना चालना मिळावी, विदर्भातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर सतत प्रयत्नशील आहेत. कपूर यांनी कृषिक्षेत्रातील विविध कंपन्यांशी निरंतर चर्चा व पाठपुरावा केल्यामुळे कॉसग्रो ॲग्रोमेड कंपनी मिहानमध्ये उद्योग सुरू करीत आहे.
या प्रकल्पात सुरुवातीला जवळपास १०० लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. या उद्योग समूहाकडून उत्पादित केलेले अन्नपदार्थ, कृषी उत्पादने व मसाले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणार असल्याने मिहान विशेष आर्थिक क्षेत्र सध्या कृषिपूरक उद्योगांसाठी पसंतीचे ठिकाण ठरत आहे. याअगोदर ‘पतंजली’ उद्योग समूहाने मिहानमध्ये मोठी गुंतवणूक केली असून, डिसेंबरपर्यंत या प्रकल्पातून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. कोरोना काळात मिहानमध्ये एव्हिएशन हब, आयटी हबच्या धर्तीवर फूड प्रोसेसिंग हबची संकल्पना पुढे येत असून, एमएडीसीकडून सकारात्मकता ठेवून केलेले व्यवस्थापन व प्रयत्न मिहानला नक्कीच फलदायी ठरत आहेत.
विस्तारीकरणात फाल्कनला ३५ एकर जमीन
मिहान-सेझमधील द साल्ट-रिलायन्स एअरोस्पेस पार्कमध्ये फाल्कन बिझनेस जेट विमानाचे विविध पार्ट तयार करून फ्रान्सला पाठविण्यात येत आहेत. जागतिकस्तरावर फाल्कनची मागणी वाढली आहे. यामुळेच एमएडीसीने कंपनीला विस्तारीकरणासाठी ३५ एकराचा भूखंड दीड महिन्यापूर्वी उपलब्ध करून दिला आहे. दीपक कपूर म्हणाले, मिहान-सेझमधील अनेक कंपन्या विस्तारीकरणाच्या टप्प्यात आहेत. हे चांगले संकेत आहेत. या कंपनीत भंडारा आणि नागपुरातील आयटीआयचे विद्यार्थी कार्यरत आहेत. स्थानिक युवकांना जागतिकस्तराच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळत आहे. नवीन कंपन्यांमुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत.