नाल्याच्या काठावर उभी आहेत खाद्यपदार्थांची दुकाने; अन्न सुरक्षा विभागाच्या नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 08:30 AM2022-02-13T08:30:00+5:302022-02-13T08:30:02+5:30
Nagpur News खाद्यपदार्थांच्या दुकानांचे शहरात पेव फुटले आहे. चाैकाचाैकात, गल्लाेगल्ली दुकाने लागलेली दिसतात. अन्न सुरक्षा विभागाच्या नियमांची ऐशीतैशी करून नाल्याच्या काठावरही खाद्यपदार्थ विकले जात आहेत.
आकांक्षा कनाेजिया
नागपूर : खाद्यपदार्थांच्या दुकानांचे शहरात पेव फुटले आहे. चाैकाचाैकात, गल्लाेगल्ली दुकाने लागलेली दिसतात. अन्न सुरक्षा विभागाच्या नियमांची ऐशीतैशी करून नाल्याच्या काठावरही खाद्यपदार्थ विकले जात आहेत. अस्वच्छतेत सर्रासपणे स्ट्रीट फूडची दुकाने सजली असून प्रशासन नियमांचे पालन करवून घेण्यात असमर्थ ठरले आहे. दुकानदार अन्न व औषधी विभागाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. त्यांच्याकडे सुरक्षित साधनेही नाहीत. कारवाई हाेत नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. कॅनाल राेड, आरटीओ, पंचशील चाैक अशा अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे २५-३० ठेले लागलेले आहेत. या दुकानांवर दिवसभर ग्राहकांची गर्दी जमलेली असते.
स्वच्छतेकडे प्रचंड दुर्लक्ष
नाल्याच्या आसपास घाण पसरलेली असते आणि अशाच परिस्थितीत काठावर खाद्यान्नाची दुकाने लागलेली आहेत. नियमानुसार त्यांच्याकडे हॅन्डग्लाेव्हज आणि डाेक्यालाही शेफ हेड लावणे बंधनकारक आहे. मात्र काेणत्याच दुकानदाराकडे ते दिसत नाही. एवढेच नाही तर खाद्यपदार्थ झाकण्यासाठी आवश्यक जाळ्यांचा उपयाेगही हाेताना दिसत नाही. अस्वच्छता आणि धुळीमध्ये हे पदार्थ विकले जात आहेत आणि या दुर्लक्षामुळे आजार हाेण्याचा धाेका वाढलेला आहे.
रस्त्यावरही अतिक्रमण
स्ट्रीटफूडची दुकाने नाल्यांच्या काठावर आणि रस्त्यावरही लागलेली आहेत. महापालिका या अतिक्रमणधारकांवर कारवाई करीत नाही. रस्त्यावर लागलेल्या दुकानांमधील गर्दीमुळे अपघात हाेण्याचीही शक्यता वाढली आहे. कारवाई हाेत नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे.
नियम ताेडणाऱ्यावर हाेते कारवाई
स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाकडून नियमित कारवाई केली जाते. नाल्याच्या काठावर लागणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करण्यात येईल. याबाबत प्रशासनाकडे माहिती किंवा तक्रार नव्हती. हा प्रकार नियमांविराेधात आहे.
- अभय देशपांडे, सहायक आयुक्त अन्न व औषधी विभाग