कामगारांना पाच रुपयात सकस आहार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 09:39 PM2019-03-07T21:39:14+5:302019-03-07T21:49:44+5:30

बांधकाम मजुरांसह राज्यातील सर्वच कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सकस आहार नाममात्र पाच रुपयात उपलब्ध करून देणाऱ्या अटल आहार योजनेचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य सरकराच्या या अटल आहार योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.

Food for workers at five Rs : Chief Minister Devendra Fadnavis | कामगारांना पाच रुपयात सकस आहार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बांधकाम मजुरांसाठी अटल आहार योजनेचा शुभारंभ करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोबत कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, पशु व दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर, खा. डॉ. विकास महात्मे, बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव

Next
ठळक मुद्देअटल आहार योजनेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांधकाम मजुरांसह राज्यातील सर्वच कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सकस आहार नाममात्र पाच रुपयात उपलब्ध करून देणाऱ्या अटल आहार योजनेचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य सरकराच्या या अटल आहार योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, पशु व दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, लघु व मध्यम उद्योगाचे अध्यक्ष संदीप जोशी, बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार आयुक्त राजीव जाधव, बांधकाम कामगार मंडळाचे सचिव श्रीरंगम, अपर कामगार आयुक्त विजय पानबुडे, समन्वयक दिनेश ठाकरे, सहायक कामगार आयुक्त लोया आणि मडावी उपस्थित होते.
कामगार कल्याणचा निर्णय १० वर्षांपूर्वी झाला. परंतु २०१४ पर्यंत केवळ एक लाख कामगारांचीच नोंदणी झाली. गेल्या दोन वर्षात आम्ही तब्बल १० लाख कामगारांची नोंदणी केली. केवळ नोंदणीच केली नाही तर त्यांच्यासाठी विविध योजनाही केल्या. शिक्षण, आरोग्यापासून तर त्यांच्या घरासाठीही योजना राबविली जात आहे. २५ लाख कामगारांची नोंदणी करणार असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना राबविल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बांधकाम कामगारांना शैक्षणिक साहाय्य, वैद्यकीय साहाय्य, अवजार खरेदी साहाय्य असे विविध लाभ देण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करण्यात आले. विदर्भ पोलीसपाटील संघटनेतर्फे मानधनवाढीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे संघटनेने आभार मानले. नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छ भारत कार्यक्रमांतर्गत विजेत्या संस्थांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अटल आहार योजनेची आहारकिट लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव यांनी मंडळाच्या कार्याचा धावता आढावा घेतला.
मजुरांना कामाच्या ठिकाणी मिळणार आहार
कामगार आयुक्त राजीव जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकेत अटल आहार योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बांधकाम मजुरांसह एकूणच कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सकस आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाच रुपयात जेवणाचा डबा उपलब्ध होईल. यासाठी प्रत्येक कामगाराला एक स्मार्ट कार्ड मिळेल, ते दाखविले की भोजन मिळेल. कामगारांच्या कामाच्या शिफ्टप्रमाणे ते उपलब्ध होईल, यासाठी गाड्यांमध्ये विशिष्ट प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. या गाड्या मजुरांच्या कामावर जाऊन त्यांना भोजन उपलब्ध करून देतील. सध्या तीन संस्थांकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ३२ विविध योजनाही राबविल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात १०० पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृह
यावेळी राज्यभरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजनाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यभरात १०० सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार असून, यापैकी ६१ सभागृहांची प्रशासकीय मान्यता झाली आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीतून या सभागृहांची निर्मिती राज्यभरात होणार आहे.
नागपुरात कामगार भवन, १० कोटी रुपये मंजूर
नागपुरात कामगार भवन उभारण्यात येणार असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केली.

 

Web Title: Food for workers at five Rs : Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.