पोलिसांची फूलप्रूफ प्लॅनिंग : अपघात आणि गुन्हे मुक्त राहिले नागपूर शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:07 IST2020-03-11T21:05:50+5:302020-03-11T21:07:35+5:30
होळीच्या दिवसात अपघात अन् गुन्हे हमखास घडत असतात. परंतु ही होळी यादृष्टीने चांगली गेली. पोलिसांच्या ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त व नियोजनामुळे गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही.

पोलिसांची फूलप्रूफ प्लॅनिंग : अपघात आणि गुन्हे मुक्त राहिले नागपूर शहर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होळीच्या दिवसात अपघात अन् गुन्हे हमखास घडत असतात. परंतु ही होळी यादृष्टीने चांगली गेली. पोलिसांच्या ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त व नियोजनामुळे गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही. तसेच वाहतुक पोलिसांनी राज्यात सर्वात मोठी मोहीम राबवित दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांसह हैदोस घालणाऱ्यांना थंड केले. त्यामुळे या होळीमुळे अपघात आणि गुन्हे घडले नाही, हे विशेष!
होळीच्या दिवशी नेहमीच गुन्हेगार आपले जुने वाद उकरून काढतात. त्यामुळे खून, मारहाणीच्या घटना घडत असतात. यासाठी पोलिसांनी यंदा विशेष उपाययोजना केल्या होत्या. पोलिसांनी काही गुन्हेगार आणि उपद्रव करणाऱ्यांना अगोदरच तुरुंगात पाठवले होेते. जे यातून वाचले त्यांना शहराबाहेर पाठवण्यात आले. होळीत दुसरी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे अपघात होय. याचे मुख्य कारण दारू पिऊन वाहन चालवणे आणि वाहन चालवताना गोंधळ घालणे होय. यासाठी वाहतूक विभागाचे डीसीपी विक्रम साळी यांनी व्यापक बंदोबस्त केला होता. जागोजागी बॅरिकेट्स लावून वाहन चालकांना रोखले जात होते. ब्रीथ अॅनलायजरने त्यांची तपासणी केली जात होती. अपघात मुक्त शहर ठेवण्याची मुख्य संकल्पना पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची होती. ती काटोकोरपणे राबवण्यात आली. स्वत: पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय हे देखरेख करीत होते. या फुलप्रूफ बंदोबस्तामुळे शहरात अपघात व गुन्हेगारीच्या घटनांवर पूर्ण नियंत्रण ठेवता आले. याचे चांगले परिणाम दिसून आले.
नागरिकांच्या मदतीमुळेच शक्य
सराईत गुन्हेगार आणि होळीत गडबड करू शकतील, अशा गुन्हेगारांविरुद्ध अगोदरच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. संवेदनशील पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे उपद्रवी लोकांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही. हे सर्व नागरिकांमुळेच शक्य झाले. नागरिकांच्या मदतीमुळेच नागपूर पोलीस प्रत्येक मोर्चावर यशस्वी ठरले. नागपूरकर विपरीत परिस्थितीतही संयम आणि शांतीने राहतात. नागपूर पोलिसांसाठीसुद्धा ही अभिमानाची बाब आहे.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय,
पोलीस आयुक्त, नागपूर शहर