फूटपाथ दुकानदारांनी केला मनपा कारवाईचा निषेध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:07 AM2021-02-10T04:07:36+5:302021-02-10T04:07:36+5:30
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणविराेधी कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईमुळे गरीब व्यावसायिकांवर अन्याय ...
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणविराेधी कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईमुळे गरीब व्यावसायिकांवर अन्याय हाेत असल्याचा आराेप करीत फूटपाथ दुकानदारांनी मनपाच्या कारवाईचा निषेध केला. मंगळवारी संविधान चाैक येथे आंदाेलन करीत मनपाने ही कारवाई त्वरित बंद करण्याची मागणी केली.
नागपूर जिल्हा पथविक्रेता संघ संलग्नित नॅशनल हाॅकर्स फेडरेशनच्यावतीने जम्मू आनंद यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले. शहरात ६० हजाराच्यावर फूटपाथ दुकानदार व हाॅकर्स आहेत. भाजीपाला, फळ विक्रीपासून लहानमाेठा व्यवसाय करणाऱ्या या दुकानदारांच्या कुटुंबांची उपजीविका या व्यवसायावरच अवलंबून आहे. तुटपुंजे भांडवल जमा करून हे लाेक छाेटासा व्यवसाय थाटतात. मात्र अतिक्रमणविराेधी पथकाद्वारे कारवाई करताना त्यांच्या मालाची नासधूस केली जाते आणि १०-१५ हजारांचा ठेलाही ताेडला जाताे. यामुळे प्रचंड नुकसान सहन करणाऱ्या व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटते. ही गरीब माणसे व्यवसाय करून सन्मानाने जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असताना प्रशासन त्यांना बेराेजगार करून चुकीच्या मार्गाने जाण्यास प्रवृत्त करीत असल्याची टीका आनंद यांनी केली. व्यवसाय करू दिला जात नसेल त्यांनी गुन्हेगारीकडे वळावे काय, असा सवाल त्यांनी केला. एकीकडे महापालिकेने या हाॅकर्सना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदाेलकांनी केली.
कारवाई ताबडताेब थांबविण्यात यावी, फूटपाथ दुकानदारांकडून वसूल केलेला दंड परत करण्यात यावा, सामानाची ताेडफाेड व फेकाफेक केली त्यासाठी नुकसान भरपाई देण्यात यावी, फूटपाथ दुकानदार (हॉकर) अधिनियम २०१४ लागू करण्यात यावा आदी मागण्या आंदाेलनादरम्यान करण्यात आल्या. यानंतर प्रवर्तन विभाग प्रमुखांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. फेडरेशनचे कार्याध्यक्ष शिरीष फुलझेले, सचिव कविता धीर, सुरेश गाैर, नियाज पठाण आदी पदाधिकारी तसेच फूटपाथ दुकानदार माेठ्या संख्येने आंदाेलनात सहभागी हाेते.