काळाने डाव साधला : मुठभर रुपयांसाठी ते काळाच्या जबड्यात शिरायचे, रोज मृत्यूशी दोन हात करायचे, अखेर...

By नरेश डोंगरे | Published: June 22, 2024 08:19 PM2024-06-22T20:19:07+5:302024-06-22T20:19:33+5:30

कंपनीत मानवी मुल्य अन् किमान वेतन कायद्याच्याही चिंधड्या...

For a handful of rupees, he would enter the jaws of time, fight with death every day | काळाने डाव साधला : मुठभर रुपयांसाठी ते काळाच्या जबड्यात शिरायचे, रोज मृत्यूशी दोन हात करायचे, अखेर...

काळाने डाव साधला : मुठभर रुपयांसाठी ते काळाच्या जबड्यात शिरायचे, रोज मृत्यूशी दोन हात करायचे, अखेर...

नरेश डोंगरे -

''पेट की आग किस तरह मजबूर कर देती है...
माैत सामने खडी है, दिखाकर उसको भी नजरअंदाज करवा देती है'' !

पोटाची आग विझविण्यासाठी व्यक्ती ईतका विवश असतो की मृत्यू समोर दिसत असूनही तो त्याकडे दुर्लक्ष करतो, कुण्या एका कवीने उपरोक्त ओळीतून भुकेमागे जगण्या-मरण्याच्या दरम्यानचा संघर्ष स्पष्ट केला आहे. नागपूर जिल्ह्यातील धामना लिंगा गावातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटातून त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. शोकविव्हळ कुटुंबियांनी मृतांची अकरावी, तेरवी करण्याची तयारी चालविली आहे. आक्रोशही सुरूच आहे अन् आक्रोशातून मृतकांच्या आठवणी तसेच खंतही ते व्यक्त करीत आहेत.

१३ जून २०२४ ला तेथे झालेल्या भीषण स्फोटात तब्बल ९ जणांचा बळी गेला. या स्फोटाच्या घटनेची पार्श्वभूमी आता तपास यंत्रणा तपासत आहेत. कशामुळे ही घटना घडली, कोण दोषी त्याचा अहवाल तपास करणारी मंडळी सादर करेल. तिकडे ज्या गावांतील कुटुंबांनी जीव गमावले त्या कुटुंबातील सदस्य राहून राहून हंबरडा फोडत आहे, आक्रोश करत आहेत. या आक्रोशातून पुढे आलेले वास्तव अत्यंत जळजळीत आहे. मृत्यू म्हटला की भल्या-भल्याच्या काळजात चर्रर होते. शेकडो कोटी रुपये देऊ केले तरी कुणी मृत्यूच्या जबड्यात जाण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही. कारण जीव अमुल्य असतो. त्याचे मोल ठरविता येत नाही, हे सर्वांनाच मान्य आहे. मात्र, धामन्याच्या कंपनीत जीव गमावणाऱ्या प्रांजली किसन मोंदरे (२२), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०), प्राची श्रीकांत फलके (१९), मोनाली शंकरराव अलोने (२५), शीतल आशिष चटप (३०) श्रद्धा वनराज पाटील (२२ सर्व रा. धामना), पन्नालाल बंदेवार (६०, रा. सातनवरी), प्रमोद चवारे (२५, रा. नेरी) आणि दानसा मरसकोल्हे (२६, रा. मध्य प्रदेश) हे बहाद्दर केवळ काही रुपयांसाठी रोज चक्क आठ तास काळाच्या जबड्यात शिरून मृत्यूशी लपवाछपवी करीत होते. आपण जे काम करतो, ते प्रचंड धोक्याचे आहे, तेथे काही झाले तर भयंकर परिणाम होऊ शकतो, याची त्यांना कल्पना होती. मात्र, घरातील परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे आणि स्वत:सोबत कुटुंबातील सदस्यांच्या पोटातील आग विझवायची असल्यामुळे हे सर्वच्या सर्व जण तो धोका पत्करत होते. केवळ २०० ते २५० रुपयांच्या बदल्यात ते रोज तब्बल ८ तास मृत्यशी दोन हात करीत होते. मृत्यूला आजुबाजुला नव्हे तर चक्क हातात खेळवत होते. अखेर ज्याची भीती होती तेच झाले अन् काळाने डाव साधला. त्यांना त्यांच्या कुटुंबियांपासून हिरावून नेले.

मानवी मुल्यांचे हनन
या कंपनी प्रशसानाच्या असंवेदनशिलतेचे अनेक संतापजनक पैलू आता तपास करणाऱ्यांच्या नजरेस आले आहेत. येथे मानवी मुल्य पायदळी तुडविले जात होते, तेसुद्धा स्पष्ट झाले होते. धोक्याच्या ठिकाणी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार मोबदला द्यावा, एवढेही भान कंपनी प्रशासनाने ठेवले नव्हते. मृतांच्या 'रोजीरोटीचे'मागचे हे धक्कादायक वास्तव सर्वसामान्यांनाच नव्हे तर तपास करणाऱ्यांपैकीही अनेकांना हलवून सोडणारे आहे.

Web Title: For a handful of rupees, he would enter the jaws of time, fight with death every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.