सोयाबीन पिकाचे ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान, २५ टक्के विमा रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश
By गणेश हुड | Published: September 27, 2023 02:54 PM2023-09-27T14:54:37+5:302023-09-27T14:55:13+5:30
कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात जिल्ह्यात गत सात वर्षाच्या उत्पादनाच्या सरासरी तुलनेत सोयाबीन पिकाचे उत्पादन ५९.१५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घटणार आहे.
नागपूर : ऑगस्ट महिन्यातील तीन आठवड्याचा खंड व सप्टेबर महिन्यातील अतिवृष्टी यामुळे नागपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात जिल्ह्यात गत सात वर्षाच्या उत्पादनाच्या सरासरी तुलनेत सोयाबीन पिकाचे उत्पादन ५९.१५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घटणार आहे. यामुळे पीक विमा उतरवलेल्या शेतकर्यांना विमा रक्कमेच्या भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगावू स्वरुपात द्यावेत, असे आदेश प्रधानमंत्री पीक विमा योजना, जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी आयसीसीआय लेम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी प्रा.लि.पुणे यांना दिले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये, गत सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट असेल, तर येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगावू रक्कम देण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सद्यस्थितीत सोयाबीन पिकाची अवस्था पाहता सोयाबीन या पिकाच्या संभाव्य नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगावू रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यात यावे, असे आदेश दिले आहे.
प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे या बाबी अंतर्गत अधिसुचित विमा क्षेत्र घटकातील सोयाबीन पिकाकरीता राज्य शासनाचे अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे.