प्रथमच अवयवदानानंतर देहदानही! मेश्राम कुटुंबियांचा पुढाकार; समाजासमोर ठेवला आदर्श
By सुमेध वाघमार | Published: January 30, 2024 06:33 PM2024-01-30T18:33:14+5:302024-01-30T18:33:22+5:30
अवयवदान मानवतेसाठी सर्वात मोठे योगदान आहे.
नागपूर: अवयवदान मानवतेसाठी सर्वात मोठे योगदान आहे. अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दाढेत जगणाऱ्यांना नवे आयुष्य मिळत आहे. तसेच अनेक डॉक्टर घडविण्यासाठी देहदानही तितके च महत्त्वाचे आहे. याची जाण असलेल्या नागपुरातील मेश्राम कुटुंबियांनी अवयवदानासोबतच देहदानही केले. नागपूरच नव्हे तर विदर्भात हे पहिल्यांदाच झाले. कामगार कॉलनी, सुभाष नगर येथील रहिवासी मोरेश्वर मेश्राम, (६९) असे अवयवदात्याचे नाव. वभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने (झेडटीसीसी) दिलेल्या माहितीनुसार, मेश्राम हे एका कं पनीमध्ये चौकीदार म्हणून कामाला होते. सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते.
काही दिवसांपूर्वी अचानक त्यांची प्रकृती खालवली. त्यांना सुरूवातीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहत त्यांना अॅलेक्सीस हॉस्पिटलमध्ये स्थानांतरीत करण्यात आले. तिथे त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव म्हणजे ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच त्यांचे ‘ब्रेन डेथ’ म्हणजे मेंदू मृत झाले. याची माहिती कुटुंबियांना देवून अवयवदानाविषयी समुपदेशन करण्यात आले. त्यांची मुले सुमित व वैभव मेश्राम यांनी अयवदानाला मंजुरी दिली. यामुळे दोन मूत्रपिंड, यकृत आणि कॉर्नियाचे दान करण्यात आले. या दोन्ही भावांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’ला (एम्स) वडिलांचे देहदानही केले. या दानामुळे मेश्राम कुटुंबियांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
-एक पुरुष, दोन महिलांना नवे आयुष्य
मेश्राम यांचे एक मूत्रपिंड अॅलेक्सिस हॉस्पिटमधील ३२ पुरुष रुग्णाला तर दुसरे मूत्रपिंड ऑरेंज सिटी हॉस्पिटलमधील ५८ वर्षीय महिलेला दान करण्यात आले. तर यकृत अॅलेक्सिस हॉस्पिटलमधील ५९ वर्षीय महिलेला दान करण्यात आले. कॉर्निया महात्मे आय बँकला देण्यात आले.