दशकभरात फेब्रुवारीमध्ये सूर्याने नागपूरकरांना दिला ताप; थंडी नाही, उन्हाचे चटके
By निशांत वानखेडे | Updated: February 2, 2025 20:46 IST2025-02-02T20:46:31+5:302025-02-02T20:46:43+5:30
दिवस-रात्रीचा पारा ४ अंशांनी चढला

दशकभरात फेब्रुवारीमध्ये सूर्याने नागपूरकरांना दिला ताप; थंडी नाही, उन्हाचे चटके
नागपूर: फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत किमान रात्री तरी थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे. मात्र, अगदीच क्षुल्लकपणे थंडीची जाणीव हाेत आहे. त्याऐवजी उन्हाचे चटके तीव्रपणे जाणवायला लागले आहेत. फेब्रुवारीची सुरुवातच चटक्यांनी झाली आहे. विशेष म्हणजे मागील दशकभरात दरवर्षी नागपूरकरांना सूर्याचा ताप जाणवला आहे. २००६ साली शतकातील सर्वाधिक ३९.२ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली आहे.
१ फेब्रुवारी रोजी ३४.२ अंशांवर असलेल्या कमाल तापमानात २ तारखेला अंशत: वाढ हाेत पारा ३४.६ अंशावर पाेहोचला, जाे सरासरीपेक्षा ४.५ अंशाने अधिक आहे. रात्रीच्या तापमानात एका अंशाची घट हाेत पारा १८.१ अंशावरून १७ अंशावर आला. रात्रीचेही तापमान सरासरीपेक्षा ३ अंशांनी अधिक आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढचा आठवडाभर रात्रीचा पारा १९ ते २० अंशांपर्यंत आणि दिवसाचा पारा ३५-३६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी गेल्यासारखीच वाटत आहे. दुचाकीवर प्रवास करताना गारवा तेवढा जाणवताे. नागपूरसह विदर्भातही पारा चांगलाच वधारला आहे. वाशिम ३६.४, ब्रह्मपुरी ३६.२, तसेच वर्धा, अकाेला, यवतमाळात ३५ अंशांची नाेंद झाली आहे.
नागपुरात गेल्या दशकभरात २०१९ साली १० जानेवारीला सर्वांत कमी ६.३ अंश तापमानाची नाेंद झाली. त्यानंतर २०१५ ला १ फेब्रुवारीला किमान पारा ७.७ अंश हाेता. २०२० ते २०२३ पर्यंत रात्रीचा पारा १० अंशांच्या खाली हाेता. शतकात १०५० साली किमान तापमान ५ अंशांवर गेले हाेते.
दशकभरात नागपूरचे फेब्रुवारीतील तापमान (अंशात)
तारीख/वर्ष कमाल तापमान किमान तापमान(तारीख)
८/२०१४ ३३.६ १०.९ (१९)
२६/२०१५ ३६.७ ७.७ (१)
२१/२०१६ ३७.१ १२.२ (६)
२२/२०१७ ३७.८ १२.६ (५)
२६/२०१८ ३६.२ १०.२ (१)
२५/२०१९ ३७.६ ६.३ (१०)
२०/२०२० ३३.५ ९.८ (१०)
२७/२०२१ ३७.७ ९.४ (८)
२४/२०२२ ३५ ९.२ (५)
२२/२०२३ ३७.४ ९.४ (४)