स्वच्छंदी आयुष्याच्या हव्यासापोटी पत्नीने ४० हजारांत दिली पतीच्या हत्येची सुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 09:46 PM2022-08-23T21:46:58+5:302022-08-23T21:47:23+5:30
Nagpur News कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ड्रायव्हरला त्याच्या घरात शिरून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. स्वच्छंद आयुष्य जगण्याच्या हव्यासापोटी पत्नीनेच त्याच्या हत्येची दोनजणांना ४० हजारांत सुपारी दिली होती.
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ड्रायव्हरला त्याच्या घरात शिरून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. स्वच्छंद आयुष्य जगण्याच्या हव्यासापोटी पत्नीनेच त्याच्या हत्येची दोनजणांना ४० हजारांत सुपारी दिली होती; परंतु दोघेही आरोपी नवे असल्याने पतीचे प्राण वाचले.
तलमले ले-आऊट येथे महेश वाढई कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांची पत्नी व दोन मुले झोपी गेले. रात्री साडेबाराच्या सुमारास महेश यांनी स्वयंपाकघराच्या दरवाज्याला कुलूप लावले व ते बेडरूममध्ये येऊन झोपले. रात्री झोपेत असताना अज्ञाताने चादर खाली त्यांचे डोके दाबून धरले व दुसऱ्या इसमाने त्यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. महेश यांनी आरडाओरड केल्यानंतर दोघेही इसम पळून गेले. त्यांची पत्नी व त्यांनी शेजारच्यांना आवाज दिला. त्यांना लगेच दवाखान्यात नेण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वयंपाकघराच्या दरवाजाला कुलूप लटकावले होते, तर मग अज्ञात इसम आत कसे काय शिरले या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला.
महेश यांची पत्नी मीनाक्षी हिचे वागणे संशयास्पद असल्याने पोलिसांनी कसून विचारपूस केली. यातून ही बाब समोर आली. तिने रोहित विजय गावतुरे (वय १८) व महेश तुलाराम गेडाम (२६, साकोली, भंडारा) यांना हत्येची सुपारी दिली होती. रोहित आणि त्याचा मित्र महेश हे गरीब कुटुंबातील आहेत. पैशाच्या हव्यासापोटी रोहित खून करण्यास तयार झाला. सोमवारी दुपारी महेशसह रोहित दुचाकीवरून साकोलीहून नागपुरात आले. ठरल्याप्रमाणे रात्री मीनाक्षीने दरवाजा उघडला व आरोपींनी आत प्रवेश केला. त्यांनी महेशवर वार केले, परंतु त्याच्या आरडाओरडीमुळे पळून गेले. मीनाक्षीला हल्लेखोरांकडून कोणतीही इजा झालेली नाही. मीनाक्षीने आरोपींना पकडण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही केला नाही ही बाब पोलिसांना खटकली.
म्हणून दिली सुपारी
महेश व मिनाक्षीचे सहा वर्षांअगोदर लग्न झाले होते व त्यांना एक मुलगा तसेच एक मुलगी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी तीन वर्षांपूर्वी उमरेड येथील एका व्यक्तीसोबत पळून गेली होती. एप्रिल महिन्यातच ती पतीकडे परतली आहे. घर आणि मुलांची जबाबदारी पाहून पतीने तिला प रत घरी घेतले. यानंतरही मीनाक्षीच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. तिच्या स्वच्छंदी स्वभावामुळे दोघांमध्ये वाद होत होते. यामुळे मीनाक्षी महेशचा काटा काढण्याच्या तयारीत होती. तिने साकोलीतील एका नातेवाइकाला 'दणकट व्यक्ती'ची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. नातेवाइकाने तिला रोहितचा नंबर दिला.
टोकन म्हणून दिले ५०० रुपये
सोमवारी दुपारी मीनाक्षी पहिल्यांदाच रोहितला भेटली. हत्येनंतर तिने ४० हजार रुपये देण्याचे वचन दिले. तिने त्यांना टोकन म्हणून ५०० रुपये दिले. साकोलीहून येथे येण्यासाठी पेट्रोलसाठी ४०० रुपये लागतील असे रोहितने म्हटल्यावर अगोदर काम करा, असे मीनाक्षीने म्हटले.