‘या’ कारणापायी अकाऊंटंटचा जॉब सोडून त्याने सुरू केल्या रेल्वेगाड्यात चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2023 10:25 PM2023-05-04T22:25:51+5:302023-05-04T22:26:13+5:30
Nagpur News ट्रान्सपोर्ट कंपनीत अकाऊंटंटची नोकरी सोडून एका युवकाने रेल्वेगाड्यात प्रवाशांचे महागडे मोबाइल, पर्स चोरी करणे सुरू केले.
नागपूर : ट्रान्सपोर्ट कंपनीत अकाऊंटंटची नोकरी सोडून एका युवकाने रेल्वेगाड्यात प्रवाशांचे महागडे मोबाइल, पर्स चोरी करणे सुरू केले. परंतु त्याचे हे कृत्य अधिक काळ टिकले नाही. लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यास अटक करून गजाआड करून त्याच्या ताब्यातून २ लाख ८ हजार ७०० रुपये किमतीचे महागडे ५ मोबाइल जप्त केले आहेत.
तुळशीराम दामोधर राठोड (वय ३१, रा. टिचर कॉलनी, कोरपना, गडचांदूर, जि. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो ट्रान्सपोर्ट कंपनीत अकाऊंटंटची नोकरी करीत होता. त्याचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक आहेत. परंतु तुळशीरामला लॉटरीचा नाद लागल्यामुळे वेतन कमी पडू लागले. त्यामुळे त्याने रेल्वेत प्रवाशांचे महागडे मोबाइल चोरी करणे सुरू केले. एक-दोन वेळा चांगले मोबाइल हाती लागल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला.
नागपूरवरून सुटणाऱ्या केरळा, जीटी, चेन्नई एक्स्प्रेस तसेच चंद्रपूर, बल्लारशाह या मार्गावरील रेल्वेगाड्यात तो चोऱ्या करू लागला. एकदा वर्धा लोहमार्ग पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. परंतु वडिलांनी जामीन घेतल्यामुळे तो सुटला. तरी देखील त्याने रेल्वेत चोऱ्या करणे सोडले नाही. प्रवाशांच्या मोबाइल चोरीच्या तक्रारी वाढल्यामुळे लोहमार्ग पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या सूचनेनुसार हवालदार महेंद्र मानकर, विनोद खोब्रागडे, नितीन शेंडे, अविन गजबे, गिरीश राऊत, मंगेश तितरमारे, बल्लारशाह येथील शिपाई संदेश लोणारे, संदीप लहासे, अभिषेक ठाकरे यांनी सापळा रचून आरोपी तुळशीरामला अटक केली. त्याच्या ताब्यातून २ लाख ८ हजार ७०० रुपयांचे पाच महागडे मोबाइल जप्त करण्यात आले. वडील मुख्याध्यापक असताना आणि अकाऊंटंटची नोकरी सोडून तो चोरीकडे वळल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले.
............