थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:43+5:302021-06-25T04:07:43+5:30
सभापतींचे निर्देश : विविध प्रकल्पांचा घेतला आढावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपाच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार पाणी ...
सभापतींचे निर्देश : विविध प्रकल्पांचा घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार पाणी बिलापोटी येणाऱ्या रकमेचे उद्दिष्ट मोठे आहे. काही ग्राहकांची थकबाकी अनेक वर्षांपासून आहे. यात शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करा. अन्यथा नळ कनेक्शन कापण्यात यावे,असे निर्देश जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांनी गुरुवारी जलप्रदाय समितीच्या बैठकीत दिले. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, समितीचे माजी सभापती विजय झलके, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
थकीत पाणी बिल वसुलीसाठी ‘अभय योजना’ राबविण्याचा प्रस्ताव जलप्रदाय विभागाने तयार करून मंजुरीसाठी मनपा आयुक्तांकडे पाठवावा, ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत नियमित पाणी बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही या योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश गवई यांनी दिले.
यावेळी सभापतींनी नागपूर शहरातील २४ बाय ७ योजनेचा आढावा घेतला. पाईपलाईन व अन्य कामांसाठी ७८ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती श्वेता बॅनर्जी यांनी दिली. विशिष्ट टँकर एकाच ठिकाणी न पाठवता प्रत्येक वेळी ते अन्य भागात पाठविण्यात यावे, असे निर्देश दिले.