विधवेच्या दोन आठवड्यांच्या बाळाची जबरदस्तीने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 08:58 PM2023-04-06T20:58:11+5:302023-04-06T20:58:50+5:30

Nagpur News नागपुरातील एका विधवा कामगार महिलेच्या दोन आठवड्यांच्या बाळाची जबरदस्तीने विक्री करण्यात आली होती. या प्रकरणात या रॅकेटमधील आरोपी रेखा पुजारी व मुन्नीबाई लिल्लारे या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Forced sale of widow's two-week-old baby | विधवेच्या दोन आठवड्यांच्या बाळाची जबरदस्तीने विक्री

विधवेच्या दोन आठवड्यांच्या बाळाची जबरदस्तीने विक्री

googlenewsNext

नागपूर : संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बाळ विक्रीच्या रॅकेटमधील आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नागपुरातील एका विधवा कामगार महिलेच्या दोन आठवड्यांच्या बाळाची जबरदस्तीने विक्री करण्यात आली होती. या प्रकरणात या रॅकेटमधील आरोपी रेखा पुजारी व मुन्नीबाई लिल्लारे या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून याप्रकरणाची आणखी पाळेमुळे खोदण्याचे काम सुरू आहे.

३० वर्षीय संबंधित महिलेला तीन मुले-मुली आहेत. बालाघाट येथून मजुरीसाठी आलेल्या महिलेच्या पतीचे २०१८ साली निधन झाले व ती त्यानंतर नातेवाईकांसोबत राहत होती. मोलमजुरी करून आयुष्याची गुजराण करणाऱ्या महिलेवर राजनांदगाव जिल्ह्यातील तिच्या माहेरच्या गावातील एका तरुणाने अत्याचार केला. यातून ती गर्भवती झाली. असे असतानादेखील महिला कामावर जात होती. तेथे मुन्नीबाई हीदेखील मोलमजुरीला जायची. महिलेने मुन्नीबाईला आपबिती सांगितली. तुझ्या प्रसूतीचा सर्व खर्च मी उचलते, आपण एखाद्या गरजवंताला बाळ देऊन टाकू, असे मुन्नीबाईने तिला सांगितले. नवव्या महिन्यात मुन्नीबाई तिला रेखा पुजारी या महिलेच्या निर्मल कॉलनी, जरीपटका येथील घरी घेऊन गेली. महिलेला अगोदर कोराडी येथील न्यू लाइफ नर्सिंग होम, त्यानंतर धंतोलीतील मुळीक इस्पितळ, डागा इस्पितळ असे फिरविले व अखेर मेयो इस्पितळात प्रसूती करविली.

२ मार्च रोजी बाळाचा जन्म झाला व त्यावेळी चिमुकल्याच्या खांद्याला जखम झाली. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. दोन्ही आरोपी महिला त्यानंतर महिला व तिच्या बाळाला रेखाच्या घरी घेऊन गेल्या. त्यानंतर होळी झाली व चार ते पाच दिवसांनी दोघी आल्या. बाळाच्या हाताची तपासणी करायला नेतो, असे सांगून त्याला घेऊन गेल्या व त्यानंतर त्याची परस्पर बाहेर विक्री केली. महिलेला हे कळताच तिने आक्रोश केला. मात्र, तो चांगल्या घरात गेला आहे, असे सांगून पोलिस तक्रार केली तर महागात पडेल, अशी धमकी मुन्नीबाई व रेखाने दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने विचारपूस केल्यावर तिला या रॅकेटची माहिती मिळाली. जरीपटका पोलिस ठाण्यात तिने तक्रार नोंदविली व पोलिसांनी दोन्ही महिलांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

पुजारीच्या घरातून हलायची सूत्रे

संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार रेखा पुजारी हिच्या घरी तिच्यासारखीच आणखी एक महिला आणून ठेवण्यात आली होती. तीदेखील गर्भवती होती व महिलेप्रमाणे तिचा संपूर्ण खर्चदेखील रेखाच करायची. रेखा अगोदरपासूनच पोलिसांच्या ताब्यात असून, तिची सखोल चौकशी सुरू आहे.

Web Title: Forced sale of widow's two-week-old baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.