नागपुरातील अलंकार चित्रपटगृहाचा बळजबरीने ताबा घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 04:06 PM2018-02-01T16:06:05+5:302018-02-01T16:07:55+5:30
भाड्याने दिलेल्या अलंकार चित्रपटगृहाचा मुळमालकीण आणि तिच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने ताबा घेतला. त्यानंतर भाडे करारानुसार खर्च झालेली रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊनही ती परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भाडेकरूने सीताबर्डी पोलिसांकडे धाव घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाड्याने दिलेल्या अलंकार चित्रपटगृहाचा मुळमालकीण आणि तिच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने ताबा घेतला. त्यानंतर भाडे करारानुसार खर्च झालेली रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊनही ती परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भाडेकरूने सीताबर्डी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियंका महेस्कर यांच्या वडीलांनी अनेक वर्षांपूर्वी अंबाझरी मार्गावर अलंकार चित्रपटगृह सुरू केले होते. वडिलोपार्जित हक्कानुसार, सध्या त्या चित्रपटगृहाचा मालकीहक्क प्रियंका महेस्कर यांच्याकडे आहे. चित्रपटगृहाची अंतर्गत सजावट करून ते भाड्याने देण्याचा करार प्रियंका यांनी तीन महिन्यांपूर्वी निखील अशोकराव लाड (वय ४०) यांच्यासोबत केला. त्यानुसार, अंतर्गत सजावटीवर लाड यांनी २५ ते ३० लाख रुपये खर्च केले. सोबतच ४० हजार रुपये महिना किरायाही देऊ लागले. मध्यंतरी लाड आणि महेस्कर तसेच त्यांचे आतेभाऊ बाबा मदन पाटील, कपील मदन पाटील आणि मृदल मदन पाटील यांच्यासोबत या भाडेकरारावरून वाद सुरू झाला. तो टोकाला पोहचला. या पार्श्वभूमीवर, १२ जानेवारीच्या पहाटे २.३० वाजता प्रियंका, बाबा, कपिल आणि मृदल पाटील आपल्या पाच ते सात साथीदारांसह अलंकार चित्रपटगृहात पोहचले. पहाटेच्या वेळी चौकीदाराव्यतिरिक्त कुणी नसल्याने त्यांनी चित्रपटगृहाचा ताबा घेतला. ते कळताच भल्या सकाळी लाड यांनी त्यांना विचारणा केली. यावेळी काही मध्यस्थांमार्फत महेस्कर, पाटील आणि लाड तसेच त्यांच्या सहका-यांची बैठक झाली. या बैठकीत लाड यांचे खर्च झालेली सर्व रक्कम परत करण्याची आरोपींनी हमी दिली. मात्र, आता तीन आठवडे होत आले तरी त्यांनी लाड यांना त्यांची रक्कम परत केली नाही. उलट त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून लाड यांनी बुधवारी सायंकाळी सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली.
ठाण्यातही समेटाचे प्रयत्न
गुन्हा दाखल होणार असे कळाल्यानंतर आरोपी महेस्कर, पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातही लाड यांच्यासोबत समेटाचे प्रयत्न केले. मात्र, आपली रक्कम परत करणार नाही, अशी खात्री पटल्यामुळे लाड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमानुसार, उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झालेली नव्हती.