‘त्या’ वाघाचा मृत्यू जलाशयात बुडाल्यामुळेच, वनविभागाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 12:33 PM2022-08-24T12:33:12+5:302022-08-24T12:37:26+5:30
नवेगाव खैरी जलाशयात आढळला हाेता मृतदेह
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर एरियातील नवेगाव खैरी जलाशयात आढळलेल्या वाघाचामृत्यू बुडल्यामुळेच झाला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. साेमवारी रात्री या वाघाचा मृतदेह जलाशयात तरंगताना आढळला हाेता.
२२ ऑगस्ट रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पवनी युसी रेंजमध्ये कोपेसरा संरक्षण झोपडी येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्याला बाजारकुंड बीटच्या राखीव जंगलात कम्पार्टमेंट क्रमांक ५५६ जवळ नवेगाव खैरी जलाशयात काठापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर प्राण्याचे शव तरंगताना आढळले. सायंकाळी उशिरा कर्मचाऱ्यांना वाघाचा मृतदेह दिसला. रात्री ९ वाजताच्या दरम्यान कर्मचारी त्या पाॅइंटवर बाेटीद्वारे पाेहोचल्यानंतर ते वाघाचेच शव असल्याचे लक्षात आले. पाण्याचा प्रवाह आणि रात्रीची वेळ असल्याने मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले नाही.
सततचा पाऊस आणि भूभागाच्या दुर्गमतेमुळे मंगळवारी दुपारी १२ वाजतापर्यंत वाघाचे शव बाहेर काढणे शक्य झाले. एफडी श्रीलक्ष्मी अन्नाबथुला, पेंचचे उपसंचालक प्रभुनाथ शुक्ला, एसीएफ अतुल देवकर, एसीएफ महेश परब यांच्या उपस्थितीत वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (डब्ल्यूआरटीसी), गोरेवाडा येथील पशुवैद्य डॉ. मयूर पावसे आणि डॉ. सुजित कोळुंगुटे यांनी पोस्टमॉर्टम केले. यावेळी पवनी युसीचे आरएफओ जयेश तायडे, एसटीपीएफ आरएफओ अनिल भगत तसेच एनटीसीएचे प्रतिनिधी उधमसिंग यादव आणि पीसीसीएफ (वन्यजीव)चे प्रतिनिधी म्हणून सातपुडा फाउंडेशनचे मंदार पिंगळे हे देखील उपस्थित होते. शिवाय एसटीपीएफ टीम आणि आरआरटी आणि क्यूआरटी टीम देखील उपस्थित होत्या.
पाण्यात पडून असल्याने नखे व शरीराचे सर्व अवयव निखळलेले आढळले. विद्युत शॉक किंवा विषबाधेचे कोणतेही चिन्ह आढळले नाही. व्हिसरल नमुने फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक स्तरावर बुडून मृत्यू झाल्याचा संशय आहे. पुढील तपास पवनीचे आरएफओ जयेश तायडे व टीमद्वारे केला जात आहे.