वन विभागाला ‘जय’चा घोर

By admin | Published: July 23, 2016 03:23 AM2016-07-23T03:23:57+5:302016-07-23T03:23:57+5:30

गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे.

The forest department is proud of Jay | वन विभागाला ‘जय’चा घोर

वन विभागाला ‘जय’चा घोर

Next

पाच पथके रवाना : पीसीसीएफची माहिती
नागपूर : गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. या वाघाने पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची अक्षरश: झोप उडविली आहे. विशेष म्हणजे, याच कार्यालयाने मोफतची प्रसिद्धी लाटण्यासाठी ‘जय’ ला हिरो बनविले होते. परंतु त्याचा शोध घेणे, या विभागाला डोईजड झाले आहे. मागील तीन महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’वरून राज्यभरात चांगलेच वादळ उठले आहे. शिवाय उलटसुलट चर्चेला उथाण आले आहे.
या सर्व चर्चेवर पांघरुण घालण्यासाठी शुक्रवारी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने घाईगर्दीत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांची पत्रपरिषद आयोजित करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान श्री भगवान यांनी ‘जय’ हा उमरेड-कऱ्हांडला जंगलाबाहेर गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली. सोबतच त्यांनी ‘जय’ चा युद्धपातळीवर शोध घेतला जात असल्याचेही सांगितले. यासाठी वन विभागाने पाच पथके तयार केले असून, या प्रत्येक पथकात प्रत्येकी पाच लोकांचा समावेश आहे. ही सर्व पथके भंडरा, पवनी, नागझिरा, गोंदिया, वडसा व गडचिरोलीपर्यंतच्या जंगलात शोध घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ वाईल्डलाईफचे (डब्ल्यूआयआय) डॉ. बिलाल हबीब यांनी ‘जय’ ला लावण्यात आलेल्या रेडिओ कॉलरची सविस्तर माहिती दिली. शिवाय त्यांनी ‘जय’ चा अधिवास हा इतर वाघांच्या तुलनेत फार मोठा राहिला असल्याचे सांगितले.
त्यांच्या मते, इतर कोणताही वाघ हा साधारण १०० ते १५० चौ. किलो मीटरच्या परिसरात फिरतो. मात्र जय हा तब्बल ५८० चौ. किलोमीटर परिसरात फिरत होता. या तुलनेत उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे क्षेत्र केवळ १९० चौ. किलो मीटर एवढे आहे. त्यामुळे तो यापूर्वी सुद्धा अनेकदा या जंगलातून बाहेर गेला आहे. मात्र तो १५ ते एक महिन्यात पुन्हा परत आला. परंतु मागील १८ एप्रिल २०१६ रोजी पवनी येथे त्याचे शेवटचे लोकेशन मिळाले असून, तेव्हापासून त्याचा शोध घेतला जात आहे.
याशिवाय मागील २५ नोव्हेंबर २०१५ रोजी बंद पडलेली रेडिओ कॉलर ही जपानमधील कंपनीकडे परत पाठविण्यात आली असून, तिचा रिपोर्ट आल्यानंतरच ती बंद का पडली ते सांगता येईल, असे ते म्हणाले. या पत्रपरिषदेला पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी व विभागीय वन अधिकारी गिरीश उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The forest department is proud of Jay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.