वनविभागाचे योद्धेही मैदानात; वनरक्षणासोबत जपली जातेय सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 08:29 PM2020-04-30T20:29:46+5:302020-04-30T20:30:19+5:30
सध्या देशभर कोरोना विषाणूचे संक्रमण पसरत आहे. राज्यातही संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे आरोग्यासाठी हानिकारक असतानाही वनविभागातील कर्मचारी मात्र रानावनात आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. सोबतच सामाजिक कार्यही करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या देशभर कोरोना विषाणूचे संक्रमण पसरत आहे. राज्यातही संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे आरोग्यासाठी हानिकारक असतानाही वनविभागातील कर्मचारी मात्र रानावनात आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. सोबतच सामाजिक कार्यही करीत आहेत.
पोलीस यंत्रणेप्रमाणेच वनविभागाचा समावेशदेखील अत्यावश्यक सेवेमध्ये आहे. यामुळे या काळातही सर्व वनमजूर, वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी सेवा बजावत आहेत. नागपूर वनविभागातील कर्मचारी-अधिकारी कर्तव्यावर हजर आहेत. नियमित बिट गस्त करणे, रात्र गस्त करणे, वनवणव्याचा हंगाम असल्याने वन्यप्राण्यांकरिता असलेले पाणस्थळ तपासणे, पाणस्थळांची साफसफाई करणे, त्यात वन्यप्राण्यांकरिता पाणी भरणे, कॅमेरा ट्रॅपिंग करणे, तसेच वनवणवा आटोक्यात आणण्याला प्रथम प्राधान्य देत आहेत. या कर्मचाऱ्यांना कोरोनापासूनच्या सुरक्षेसाठी उपवनसंरक्षकांनी मास्क, सॅनिटायझर व हॅण्ड ग्लोव्ह्जचा पुरवठा केला आहे.
अंबाझरी वनक्षेत्रात एसआरपीएफची तुकडी
वन्यजीवांच्या सुरक्षेसह वनहानी टाळण्यासाठी यंदा अंबाझरी वनक्षेत्रात एसआरपीएफची तुकडी पायदळ गस्त घालत आहे. गरजेच्या ठिकाणी ड्रोन कॅमेºयाचा वापर केला जात आहे. आवश्यक ठिकाणी तात्काळ सेवा देणे व आवश्यक विषयाची माहिती ई-मेल किंवा नेटद्वारे सादर करणे, अशा प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर ही तुकडी करत आहे.
वनविभाग जपतोय सामाजिक बांधिलकी
वनरक्षणासोबतच वनविभागाचे कर्मचारी-अधिकारी कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकीही जपत आहेत. कर्तव्यावरील पोलिसांना आणि व वनकर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर व हॅण्डग्लोव्ह्ज वाटप केले जात आहे. गरजूंना भोजनदानाचा उपक्रमही वनविभाग राबवीत आहे. सेमिनरी हिल्स व अंबाझरी जैवविविधता उद्यानातून वनकर्मचारी स्वखर्चाने दरररोज ४०० गरजूंना भोजनदान करीत आहेत, तसेच ५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे.