बिबट्यांचे नियंत्रण आणि अधिवासासाठी वनविभाग धोरण आखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 11:31 AM2021-02-16T11:31:56+5:302021-02-16T11:33:09+5:30

Nagpur News बिबट्यांच्या नियंत्रणासाठी आणि संरक्षित अधिवासासाठी वनविभागाकडे निश्चित धोरण नव्हते. मात्र अलीकडेच या अध्ययनासाठी आणि तोडगा काढण्यासाठी बिबटे-मानव संघर्ष अध्ययन समितीची स्थापना झाली आहे.

The Forest Department will formulate a policy for leopard control and habitat | बिबट्यांचे नियंत्रण आणि अधिवासासाठी वनविभाग धोरण आखणार

बिबट्यांचे नियंत्रण आणि अधिवासासाठी वनविभाग धोरण आखणार

Next
ठळक मुद्देराज्यातील मानव-बिबटे संघर्षावर उपाययोजना सुचविणारअभ्यास समितीची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात वाघांसोबतच बिबट्याची संख्या अधिक वाढत आहे. वाघांंचीही संख्या अधिक आहे. मानवी वस्तीपर्यंत बिबटे येऊन पोहोचण्याच्या घटना वारंवार घडत असल्या तरी बिबट्यांच्या नियंत्रणासाठी आणि संरक्षित अधिवासासाठी वनविभागाकडे निश्चित धोरण नव्हते. मात्र अलीकडेच या अध्ययनासाठी आणि तोडगा काढण्यासाठी बिबटे-मानव संघर्ष अध्ययन समितीची स्थापना झाली आहे. या समितीच्या अहवालानंतर वनविभाग धोरण आखणार आहे.

विदर्भात वाघांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. विदर्भातील बिबटे जंगलाच्या काठावरील मानवी वस्त्यांच्या आश्रयाने स्थिरावले आहेत. तर पश्चिम महराष्ट्रातील बिबट्यांनी उसाच्या शेतीचा अधिवास स्वीकारला आहे. कुत्रे हे त्यांचे आवडते खाद्य असल्याने व ते सहज उपलब्ध होत असल्याने मानवी वस्तींचा आधार त्यांच्यासाठी सोईचा ठरत आहे.

उसाच्या शेतीची तोड करताना यातील धोका पुढे आल्याच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात शूटरच्या माध्यमातून बिबट्याला ठार करण्यात आले होते. त्यामुळे उसाच्या अधिवासात बिबटे स्थिरावणे धोकादायक मानले जात आहे. हा धोका लक्षात घेऊन यावर उपाययोजना आखली जावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होती. अलीकडे २० डिसेंबर २०२० झालेल्या राज्य वन्यजीव मंडळच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांपुढे हा मुद्दा आला होता. त्यानंतर २८ जानेवारीला वनविभागाने यासंदर्भात परिपत्रक काढून ही राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या ११ सदस्यीय समितीचे अध्यक्ष मुंबईचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये आहेत. राज्यातील बिबटे क्षेत्रातील समस्यांचा आणि तेथील परिस्थितीचा अभ्यास ही समिती करणार आहे. बिबटे संवर्धन, संरक्षणासोबतच मानवांसोबतचा संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने ही समिती अध्ययन करणार आहे.

जुन्नर वनविभागात बिबट्यांवर संशोधन प्रकल्प

जुन्नर वनविभागातील बिबट्यांवर संशोधन, करण्याचा प्रकल्प वनविभागाने हाती घेतला असून या चार वर्षांच्या प्रकल्पावर २.१२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यात बिबट्यांची संख्या, घनता, विपुलता, संख्या शास्त्रीय रचना, आहारविषयक सवयींचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच वनसंपत्तीवर लोकांचे असणारे अवलंबन याचाही अभ्यास होणार आहे.

वाघापेक्षा बिबटे वाढले

अलीकडे झालेल्या अध्ययनानुसार, राज्यात वाघांच्या संख्येत ३० टक्के, तर बिबट्यांच्या संख्येत ४० टक्के वाढ झाली आहे. राज्यातील गतवर्षीच्या अहवालानुसार, १६९० बिबट्यांची संख्या नोंदविण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांची संख्या अधिक आहे. या अहवालानुसार, १७८ बिबट्यांचे मृत्यू झाले असून मागील वर्षीच्या तुलनेत २०२० मध्ये ६८ बिबट्यांचे मृत्यू अधिक आहेत.

राज्य वन्यजीव अभ्यास मंडळाच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ‘बिबटे समस्यामुक्त ग्राम’ ही योजना आम्ही वनविभागाला दिली असून मागील तीन महिन्यांपासून यावर काम सुरू आहे.

- बंडू धोतरे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

Web Title: The Forest Department will formulate a policy for leopard control and habitat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.