लम्पीपासून वन्यजीवांच्या बचावासाठी वनविभागाचा लसीकरणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 09:57 AM2020-09-08T09:57:42+5:302020-09-08T09:59:36+5:30
रानगवा हा प्राणी या वर्गात मोडत असल्याने त्याच्या संसर्गाची शक्यता वाढली आहे. त्याची शिकार वाघ, बिबटे यांच्याकडून होते. त्यांनी अर्धवट खाल्लेले मांस रानकुत्रे, कोल्हे, लांडगे खातात. यामुळे त्यांच्या माध्यमातून हा आजार जंगलात पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गावांमध्ये शिरकाव झालेल्या लम्पी स्किन डिसीजची लागण जंगलातील गायवर्गीय जनावरांना होऊ नये यासाठी वनविभागाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बफर आणि कोअर क्षेत्रातील गावांमधील जनावरांच्या लसीकरणावर आणि गोठ्यांच्या फवारणीवर भर देणे सुरू केले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह बोर अभयारण्य, पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वनविभागाने या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जंगलालगत असलेल्या गावांमधील जनावरे जंगलात चरण्यासाठी जातात. गोचीड, गोमाशी यांच्या माध्यमातून जंगलातील गाय व म्हैसवर्गीय प्राण्यांना याचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे. रानगवा हा प्राणी या वर्गात मोडत असल्याने त्याच्या संसर्गाची शक्यता वाढली आहे. त्याची शिकार वाघ, बिबटे यांच्याकडून होते. त्यांनी अर्धवट खाल्लेले मांस रानकुत्रे, कोल्हे, लांडगे खातात. यामुळे त्यांच्या माध्यमातून हा आजार जंगलात पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे. हे लक्षात घेता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गायी, म्हशी, बकऱ्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. सध्या चंद्रपूर जिल्हा लम्पीचा हॉटस्पॉट झाला आहे. वनविभागाने पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने बफर आणि कोअर क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. या गावांमध्यील जनावरांचे लसीकरण, विलगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. जनावरांचे रक्तनमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जात आहेत.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर म्हणाले, वनविभागाने दक्षता घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. पेंच, बोर अभयारण्यात अद्याप तरी वन्यजीवांना लम्पीची लागण नाही. जंगलालगतच्या गावांमधील जनावरांचे लसीकरण, गोठा निर्जंतुकीकरण दरवर्षी केले जात असल्याने या परिसरात लम्पीचा प्रसार बराच आटोक्यात आहे. लम्पीचे प्रमाण अधिक असल्यास वन्यजीवांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.
ताडोबालगतच्या १२ गावांत चाराबंदी
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या १२ गावांमध्ये वनविभागाने चाराबंदी केली आहे. या सर्व गावांमध्ये लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत घेतली जात आहेत. लसीकरणासाठी गोट फॉक्स व्हॅक्सिनचे एक हजार डोजेस हेस्टर बायोसायन्सेस पुणे यांच्याकडून खरेदी करण्यात आले आहेत. ताडोबाच्या कोअरमधील रानतळोधी, देवाडा, जुनोना, मोहर्ली, भामडेळी, कोळसा या गावांमधील १,०५१ पैकी ३५० जनावरे लम्पीग्रस्त आढळली. तर, बफरगावमधील पळसगाव, मदनापूर, विहीरगाव, बेलोरा, पिपर्डा, गोंडामोहाळी या सहा गावात ३,५२१ पैकी ३१८ जनावरे बाधित आढळल्याची नोंद वनविभागाने मागील आठवड्यात घेतली आहे.
वन्यजीवांना लम्पीचा धोका नाही : जितेंद्र रामगावकर
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले, लम्पीची बाधा वन्यजीवांना होत नाही. आपण स्वत: पशुवैद्यकीय अधिकारीही आहेत. वन्यजीवांना लम्पीची बाधा होत नाही, ही वैज्ञानिक माहिती असून ओवायई संस्थेच्या रेकॉर्डवरही ती आली आहे.