वन महोत्सव विशेष : वृक्षारोपण करताना देशी झाडांना द्या प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 08:44 PM2020-07-01T20:44:27+5:302020-07-01T20:46:03+5:30
वृक्षारोपण करणे गरजेचे आहे पण निव्वळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यापेक्षा अशा देशी झाडांची लागवड केली तर त्याचे फायदे अधिक आणि चिरकाल टिकणारे ठरतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या परिसरात असलेल्या वड, आंबा, चिंच अशा विशाल झाडांकडे कधी निरखून पाहिलेत का? या गर्द हिरव्या झाडांची घनदाट सावली, फांदीफांदीवर असलेले पक्ष्यांचे घरटे, त्यांचा किलबिलाट पाहायला मिळेल. हे चित्र दुर्मिळ वाटते म्हणून वृक्ष लागवड करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रजातीच्या झाडाचे असो, वृक्षारोपण करणे गरजेचे आहे पण निव्वळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यापेक्षा अशा देशी झाडांची लागवड केली तर त्याचे फायदे अधिक आणि चिरकाल टिकणारे ठरतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमींकडून देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्याबाबत आग्रह होत आहे. मधल्या काळात रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करताना गुलमोहर, सुबाभूळ किंवा लांब वाढणाऱ्या अशोका आदी वृक्षांच्या लागवडीचे चलन वाढले होते. मात्र काही पर्यावरण प्रेमींच्या मते हे परदेशी वृक्ष शोभिवंत दिसण्याशिवाय फारसे फायदेशीर नाहीत. याबाबत वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. निरंकुश खुबाळकर यांनी दिलेली माहिती उपयुक्त अशी आहे.
डॉ. खुबाळकर यांच्या मते वृक्षांमध्ये भेदभाव करता येणार नाही. ज्याप्रमाणे माणसे आणि पक्षीही या देशातून त्या देशात मुक्त विहार करीत असतात, त्याप्रमाणे वृक्षांची आदानप्रदान गैर नाही. मात्र देशी प्रजातीच्या वृक्षांचे फायदे अधिक आहेत. आंबा, वड, चिंच, पिंपळ, कडुलिंब हे वृक्ष आकाराने मोठे आणि त्यांचा परीघ अधिक असतो. त्यामुळे दूर दूर अंतरावर लावले तरी छान बहरतात. ही झाडे दाट असल्याने पक्ष्यांची जैवविविधता अधिक वाढते. घनदाट सावली ही कधीही शांतता देणारी असते. शिवाय फळे येत असल्याने माणसांसह प्राणी आणि पक्ष्यांना लाभदायक असतात. मोठे उंबराचे झाड हे याचप्रमाणे फायदेशीर असते. जाड पानांमुळे आॅक्सिजन बाहेर सोडण्याची क्षमता अधिक असते. महत्त्वाचे म्हणजे ही झाडे एकदा लावली की वर्षानुवर्षे टिकून राहतात, त्यामुळे पुन्हा पुन्हा वृक्षारोपणाची गरज पडत नाही.
याउलट गुलमोहरासारखे वृक्ष फार टिकणारे नसतात. मात्र या झाडांना एकदमच नाकारण्यापेक्षा मधे मधे लागवड करण्यात गैर नाही. उन्हाळ्यात रस्त्याने जाताना पळस फुलांसारखी या झाडांची बहरलेली फुले कधीही आकर्षित करतात. त्यामुळे देशी वृक्षांना प्राधान्य देताना या झाडांचीही निवड आवश्यक असल्याचे मत डॉ. खुबाळकर यांनी व्यक्त केले.