वन मुख्यालयाचा क्लर्क पॉझिटिव्ह: विभागात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:31 PM2020-07-17T22:31:08+5:302020-07-17T22:33:03+5:30
वन मुख्यालयात कार्यरत एका ४५ वर्षीय क्लर्कला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे नुकतीच या मुख्यालयाच्या रोखपालाचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने वन कर्मचारी व अधिकाऱ्यांची धास्ती वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वन मुख्यालयात कार्यरत एका ४५ वर्षीय क्लर्कला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे नुकतीच या मुख्यालयाच्या रोखपालाचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने वन कर्मचारी व अधिकाऱ्यांची धास्ती वाढली आहे.
रविवारी वनविभागाच्या पब्लिसिटी शाखेचा रोखपालांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. दुपारी त्यांचा अहवालात ते कोविड संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय मुख्यालयातील प्रत्येक विभागाच्या केवळ एका कर्मचाऱ्याला उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले. सूत्राच्या माहितीनुसार, मृत कर्मचाऱ्यावर किडनीचे उपचार सुरू होते. यामुळे वन विभागाच्या बजेट विभागात क्लर्क म्हणून कार्यरत त्यांचे मित्र त्यांना रुग्णालयात घेऊन जायचे. दरम्यान, गुरुवारी संबंधित क्लर्कचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक वन मुख्यालयात पोहचले. त्यांनी बजेट विभागात कार्यरत ७-८ कर्मचाऱ्यांचे स्वॅब सॅम्पल जमा केले. या नमुन्यांचा अहवाल शनिवारी येण्याची शक्यता आहे.
अहवाल पाहून घेणार पुढचा निर्णय
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॉ. एन. रामबाबू यांनी सांगितले, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बजेट विभागाच्या कर्मचाऱ्यांची रिपोर्ट शनिवारी प्राप्त होईल. त्या सर्वांचा अहवाल पाहिल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वन मुख्यालयाला सॅनिटाईझ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनपाचे आरोग्य अधिकारीही ‘पॉझिटिव्ह’
मनपा धरमपेठ झोनचे आरोग्य अधिकारीही कोविड-१९ पॉझिटिव्ह आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य अधिकारी राहत असलेल्या कॉलनीतील एक व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना एम्समध्ये भर्ती करण्यात आले आहे. दरम्यान, धरमपेठ झोन येथील त्यांच्या विभागाला सॅनिटाईझ करण्यात आले. यासोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. परंतु कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.