नागपूर जिल्ह्यात वन अधिकारी लाच घेताना अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:21 AM2018-10-31T11:21:28+5:302018-10-31T11:22:07+5:30
शेताला तारांचे कुंपण घालण्याची परवानगी देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेताला तारांचे कुंपण घालण्याची परवानगी देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनी येथे मंगळवारी सायंकाळी करण्यात आली.
किशोर मारोतराव कैलुके, असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारकर्ता श्ोतकरी हा हिवराबाजार (ता. रामटेक) येथील असून, त्याची हिवराबाजार शिवारात ३.१४ हेक्टर शेती आहे.
सदर शेती विकत घेतल्याने त्याने शेतीची भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मोजणी केली आणि त्याची क प्रतही मिळविली. या शेताला तारांचे कुंपण करावयाचे असल्याने त्याला वन विभागाची परवानगी हवी होती. त्यामुळे त्याने वन परिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके यांची भेट घेतली आणि परवानगी मागितली.
सदर कामासाठी कैलुके यांनी त्या शेतकऱ्याला ३० हजार रुपयांची मागणी केली. परंतु, ही रक्कम देण्याची शेतकऱ्याची इच्छा नसल्याने त्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली होती. ठरल्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सापळा रचला. कैलुके यांनी पहिल्या हप्त्यातील १० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडून अटक केली. हल्ली रामटेक तालुक्यातील देवलापार पिरसरातील बहुतांश शेतकरी वन अधिकाऱ्यांच्या असल्या कारभाराला व त्रासाला वैतागले आहेत. त्यातच ही कारवाई झाल्याने वन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर काहीसा वचक निर्माण झाला आहे.
याप्रकरणी त्यांच्याविरोधात देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुदलवार यांच्या मार्गदर्शनात एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल गीते, हवालदार अशोक बैस, शिपाई रविकांत डहाट, मंगेश कळंबे, वकील शेख यांच्या पथकाने केली.