वन अधिकाऱ्यांनी झाडांची केली कत्तल

By admin | Published: March 8, 2017 02:39 AM2017-03-08T02:39:30+5:302017-03-08T02:39:30+5:30

एका वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जंगलात मातीबांध तयार करण्यासाठी चक्क जेसीबीच्या मदतीने झाडांची कत्तल

Forest officials planted slaughter houses | वन अधिकाऱ्यांनी झाडांची केली कत्तल

वन अधिकाऱ्यांनी झाडांची केली कत्तल

Next

भ्रष्टाचाराचा आरोप : गावकऱ्यांची वरिष्ठांकडे लेखी तक्रार
नागपूर : एका वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जंगलात मातीबांध तयार करण्यासाठी चक्क जेसीबीच्या मदतीने झाडांची कत्तल केल्याच्या गंभीर आरोपासह काही गावकऱ्यांनी थेट राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) आणि पेंचचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, या लेखी तक्रारीसोबत ३५ गावकऱ्यांच्या स्वाक्षरीसह नावांची यादी जोडण्यात आली आहे. आरएफओ पी. एस. पाखले असे त्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून, ते सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पवनी (बफर झोन) येथे कार्यरत आहेत.
गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार, आरएफओ पाखले यांनी मागील २०१६ मध्ये पिपरिया येथील नर्सरीतील पॉलीबॅग भरण्यासाठी सरकारी जंगलातील रेती व मातीचा उपयोग करून त्याचे लाखो रुपये स्वत: हडप केले. तसेच नेटचे शेड तयार करण्यासाठी जंगलातील हिरवे बांबू तोडून त्याचा उपयोग करण्यात आला. शिवाय मजुरांना नियमाप्रमाणे ३०३ रुपये मजुरी देणे आवश्यक असताना त्यांना हुंडा पद्घतीने मजुरी देऊन त्यात लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोबतच १ जुलै २०१६ रोजी राज्यभरात राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत येथे १० हजार खड्डे खोदण्यात आले होते. परंतु त्यातही पाखले यांनी मजुरांना खड्डा खोदण्याचा दर जास्त असताना केवळ १० रुपये प्रति खड्डा मजुरी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय जंगलात आवश्यकता नसताना तब्बल २० ते २५ बोअरवेल खोदून त्यात ठेकेदारांकडून कमिशन वसूल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अशा अनेक गंभीर आरोपांसह गावकऱ्यांनी संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या गंभीर आरोपानंतरही वनभवन आणि पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने गावकऱ्यांच्या त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.(प्रतिनिधी)

आरएफओ म्हणतात,
सर्व आरोप खोटे
यासंबंधी वन परिक्षेत्र अधिकारी पी. एस. पाखले यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू ऐकून घेतली असता, त्यांनी गावकऱ्यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला. शिवाय ते पुढे म्हणाले, गावकऱ्यांच्या या तक्रारीनंतर पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील सहायक वनसंरक्षक भागवत यांनी विचारपूस केली. परंतु त्यांना काहीही तथ्य आढळून आले नाही. उलट तक्रारीतील गावकऱ्यांची काही नावे आणि स्वाक्षऱ्या या खोट्या असल्याचाही यावेळी पाखले यांनी आरोप केला.
 

Web Title: Forest officials planted slaughter houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.