शाळेसाठी जंगलातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:09 AM2020-12-24T04:09:38+5:302020-12-24T04:09:38+5:30
पर्याप्त साधनांचा अभाव : कोण घेणार दखल? मनोज झाडे वानाडोंगरी : अनलॉकनंतर अखेर १४ डिसेंबरपासून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ...
पर्याप्त साधनांचा अभाव : कोण घेणार दखल?
मनोज झाडे
वानाडोंगरी : अनलॉकनंतर अखेर १४ डिसेंबरपासून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात इयत्ता ९ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अद्यापही पर्याप्त साधने उपलब्ध नसल्याने शाळेत जाताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच अडचणींचा सामना सध्या हिंगणा तालुक्यातील आडेगाव येथील साईनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. या शाळेत पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गोठणगाव आणि मोहगाव (ढोले ) येथील ४० हून अधिक विद्यार्थी बोर अभयारण्याला लागून असलेल्या जंगल रस्त्याने जीव मुठीत धरून पायीव ये-जा करतात. मात्र प्रशासनाकडून कुठलीही प्रवास व्यवस्था करण्यात आली नसल्याची व्यथा विद्यार्थ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे मांडली.
अडेगाव, गोठणगाव, मोहगाव हा परिसर वनपरिक्षेत्राने वेढलेला आहे. याच परिसरात बोर अभयारण्याचा बराच भाग मोडतो. येथे नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. वाघ, अस्वल, रोही, सांबर, डुक्कर, बिबट, इत्यादी प्राण्यांचा वावर या परिसरात असतो. बरेचदा वन्यप्राणी रस्त्यावरच पाहायला मिळतात. येथे पाळीव प्राण्यांची शिकार नित्याची बाब आहे. अशात शाळेसाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना वन्यप्राण्यांकडूनही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी पर्याप्त साधनांची सोय प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
--
वन्यप्राण्यांची भीती वाटते पण आमच्याकडे शिक्षण घेण्यासाठी दुसरा पर्याय नाही. गावात फक्त पाचवीपर्यंतच शिक्षण आहे. पुढील शिक्षणासाठी अडेगाव हायस्कूलला जाणे हाच पर्याय उरतो.
स्नेहल फरकडे, पायल वाघाडे, पूजा लांडे.
विद्यार्थिनी मु. मोहगाव (ढोले), ता. हिंगणा