वन विभागात ‘त्या’ ट्रकचा गोलमाल!
By admin | Published: September 27, 2015 02:26 AM2015-09-27T02:26:31+5:302015-09-27T02:26:31+5:30
वन विभागाने गाजावाजा करीत पकडलेला सागाच्या लाकडाचा ट्रक केवळ पाच हजार रुपयांचा दंड वसूल करू न सोडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
जप्तीचे नाट्य उघड : वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नागपूर : वन विभागाने गाजावाजा करीत पकडलेला सागाच्या लाकडाचा ट्रक केवळ पाच हजार रुपयांचा दंड वसूल करू न सोडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बुटीबोरी येथील वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ठेंगडी यांनी मागील ३१ आॅगस्ट रोजी रात्री १.३० वाजता कमालीचा तामजाम करू न ट्रक क्र. टीएन ५२ / एच/ ६१२७ हा पकडला होता. त्या ट्रकमध्ये कापशी खुर्द (बुदरुक) येथील शिवशक्ती टिंबर कॉर्पोरेशन येथून माल भरू न तो विना वाहतूक परवाना केरळमधील कैराली टिंबर विठानसेरी निंबारा पालखड येथे नेण्यात येत होता. परंतु ठेंगडी यांनी तो ट्रक बुटीबोरी येथील वन उपज तपासणी नाक्यावर रात्री १.३० वाजता पकडला होता. त्या ट्रकमध्ये बाभळीच्या लाकडात लाखो रुपयांचे सागवान लपवून नेले जात होते. या कामगिरीसाठी ठेंगडी यांचे कौतुकही करण्यात आले. मात्र काहीच दिवसांत त्या ट्रक मालकांकडून केवळ पाच हजार रुपयांचा दंड वसूल करू न, तो ट्रक सोडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. वन अधिकारी नियमानुसार संबंधित ट्रक मालकांकडून दंड वसूल करू न ट्रक सोडण्यात आल्याचे सांगत आहेत. मात्र एखादी सामान्य व्यक्ती केवळ सागाच्या एका दांडीसह पकडली गेली, तरी त्याच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करू न, त्याला कारागृहात डांबले जाते. परंतु या प्रकरणात लाखो रुपयांचे सागवान पकडण्यात आले असताना ते केवळ पाच हजार रुपयांत सोडण्यात आले. यासाठी ते सागवान ‘इम्पोर्टेड’ दाखवून, वरिष्ठांची परवानगी प्राप्त करण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर त्यासाठी स्वत: संंबंधित वनाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका वठविल्याची माहिती आहे. वन विभागातील काही जाणकारांनी ते सागवान ‘इम्पोर्टेड’ नसल्याचा दावा केला आहे. यावरू न केवळ ट्रकच्या जप्तीचे नाट्य रंगविण्यात असल्याचे दिसून येत आहे. तसेच वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे.
पकडण्यात आलेल्या ट्रकमध्ये चिरान सागाचे ८४४ नग म्हणजे, १०.७९६ घनमीटर माल आढळून आला. खुल्या बाजारात या सर्व सागाची किंमत सुमारे ८ ते १० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय ट्रकमध्ये आडजात बाभळीचे ५९३ नग आढळून आले होते. दरम्यान वन अधिकाऱ्यांनी त्या ट्रकसह त्याचा चालक बालसुब्रमण्यम कुप्पूस्वामी (वय २८ वर्षे) रा. इरुसामापट्टी चेन्नागिरी (केरळ) याला ताब्यात घेतले होते. यानिमित्ताने मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सागवान लाकडाच्या तस्करीचा भंडाफोड झाला होता. शिवाय यातून मोठे रॅकेट पुढे येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र काहीच दिवसांत त्या सर्व अपेक्षा फोल ठरल्या.(प्रतिनिधी)