देवलापारच्या शाळेतून वन अध्यापक योजनेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:56+5:302021-09-19T04:09:56+5:30
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या वन अध्यापक या नावीन्यपूर्ण योजनेला ...
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या वन अध्यापक या नावीन्यपूर्ण योजनेला देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातून प्रारंभ झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून वन कर्मचारी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना आता वन, वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणाचे धडे देणार आहेत.
या उपक्रमाचे उद्घाटन शाळेत समारंभपूर्वक झाले. अध्यक्षस्थानी आ. आशिष जयस्वाल होते. पेंच प्रकल्पाचे उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल, प्राचार्य गराडे पाहुणे होते.
कार्यक्रमादरम्यान वन विभागाच्या वतीने शाळेला संगणक संच आणि प्रोजेक्टर भेट देण्यात आले. वन अध्यापनासाठी चित्रफिती दाखिवताना त्याचा उपयोग होणार आहे. आ. जयस्वाल यांनी या योजनेचे कौतुक केले. हा उपक्रम व्यापक व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्ल यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान वनरक्षक वर्षा जगताप यांनी चित्रफितीद्वारे सादरीकरण, योजना राबविताना जबाबदारी व कर्तव्य तसेच वन विभागाचा यामागील उद्देश याबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक वन परिक्षेत्र अधिकारी देवलापार विजय चौधरी यांनी केले, तर
आभार देवलापार वन परिक्षेत्र अधिकारी प्रियदर्शन बाभळे यांनी मानले. पवनीचे वन परिक्षेत्र अधिकारी जे.आर. तायडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि वन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.