बोर व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटन पुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:56 PM2020-09-30T22:56:29+5:302020-09-30T22:57:52+5:30
बोर व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटन १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला असला, तरी आता पुन्हा ते १५ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला आहे. बोरधरण वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या संपर्कातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोर व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटन १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला असला, तरी आता पुन्हा ते १५ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला आहे. बोरधरण वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या संपर्कातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी डॉ. अजित साजणे यांनी ३० सप्टेंबरला ही माहिती जारी करून बोरमधील पर्यटन लांबणीवर पडल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात १५ सप्टेंबरलाच बोर व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु कोरोना संक्रमणाच्या या घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील वनपर्यटन १५ दिवस लांबणीवर टाकण्यात आले आहे. अलीकडे अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील रस्ते खराब झाले होते. ते दुरुस्त करणे शक्य झाले नाही, हे देखील कारण पेंच व्याघ्र प्रकल्पाने जोडले आहे. यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना पुन्हा १५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.