मध्यप्रदेशातील वनपर्यटन १ जूनपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:31+5:302021-05-31T04:07:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची लागण देशात कमी होत असल्याने जून-२१ पासून विविध राज्यांतील क्षेत्रे टप्प्याटप्प्याने उघडली जात ...

Forest tourism in Madhya Pradesh will start from June 1 | मध्यप्रदेशातील वनपर्यटन १ जूनपासून सुरू होणार

मध्यप्रदेशातील वनपर्यटन १ जूनपासून सुरू होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची लागण देशात कमी होत असल्याने जून-२१ पासून विविध राज्यांतील क्षेत्रे टप्प्याटप्प्याने उघडली जात आहेत. मध्य प्रदेश वन विभागही वन्यजीव पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून मध्य प्रदेशातील सर्व व्याघ्रप्रकल्प, वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने पर्यटकांसाठी १ जूनपासून उघडली जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्र वन विभागाने अद्याप असा निर्णय घेतलेला नाही. मध्य प्रदेश वनविभागाने हा निर्णय घेताना फक्त पर्यटकांना निसर्गसौंदर्य उपभोगू देण्याएवढाच उद्देश ठेवला नसून, इको टुरिझमवर अवलंबून जिप्सीचालक, मार्गदर्शक आणि पर्यटन क्षेत्रातील रोजगारांचाही विचार केला आहे.

मध्य प्रदेश वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आलोक कुमार यांनी रविवारी ‘लोकमत’ला माहिती देताना म्हणाले, राज्याचे वनमंत्री विजय शहा यांनी आदल्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि वनपर्यटन उघडण्याच्या संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानुसार हा निर्णय झाला आहे. सफारीच्या वेळी एका जिप्सीमध्ये एका कुटुंबातील सहा व्यक्तींना परवानगी दिली जाईल. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त चारजणांच्या गटाला सफारीसाठी परवानगी दिली जाईल. आरटीपीसीआर चाचणी अहवालाची पर्यटकांना सक्ती नाही. मात्र त्यांना प्रवेशद्वारातून थर्मल स्क्रीनिंग करावी लागेल.

या निर्णयामुळे इको टुरिझमवर अवलंबून असलेले जिप्सीचालक, मार्गदर्शक, स्थानिक रहिवासी आणि लॉज व्यावसायिक तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने लवकरच वन उद्याने बंद करावी लागणार आहेत. त्यामुळे चालू हंगामात अत्यल्प कालावधीसाठी रोजगार मिळाला असला तरी हे पर्यटन आर्थिक उलाढालीसाठी साहाय्यभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

पेंच (मध्यप्रदेश) येथील रिसॉर्टचे संचालक संदीप सिंह म्हणाले, वनपर्यटन सुरू करण्याच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे केवळ वन्यजीव पर्यटनावर अवलंबून असलेल्या आतिथ्य उद्योगातील मृत अर्थव्यवस्थेलाच चालना मिळणार नसून, यावर अवलंबून असलेले गाईड्‌स, चालक या सर्वांनाच लाभ होणार आहे.

...

महाराष्ट्रात आठवडाभरात निर्णय

महाराष्ट्र वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर म्हणाले, राज्यात इको टुरिझम सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील संचालकांना सध्याच्या कोरोना संक्रमणासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यास सांगितले आहे. वनपर्यटन बंद ठेवल्याने या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य केले. पावसाळ्यात वनउद्याने पुन्हा बंद होण्यापूर्वी महिनाभराचे पर्यटन अर्थार्जनासाठी उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

...

Web Title: Forest tourism in Madhya Pradesh will start from June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.