उमरेड-कऱ्हांडला वनपर्यटनाला परवानगी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 09:18 PM2020-07-03T21:18:49+5:302020-07-03T21:21:34+5:30
राज्य शासनातर्फे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून केंद्राच्या मार्गदर्शनानुसार राज्यात वनपर्यटन सुरू करण्यात येत आहे. मात्र उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन करण्यासाठी पर्यटकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वन विभागाने येथील पर्यटन सुरू करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनातर्फे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून केंद्राच्या मार्गदर्शनानुसार राज्यात वनपर्यटन सुरू करण्यात येत आहे. मात्र उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन करण्यासाठी पर्यटकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वन विभागाने येथील पर्यटन सुरू करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे.
कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यानुसार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटनावरही बंदी आली होती. सध्या अनलॉक-२ सुरू झाले आहे. त्यामुळे निसर्ग पर्यटनाशी निगडित स्थानिक लोकांचा रोजगार पूर्ववत करण्याच्या हेतूने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधान वन संरक्षक, नागपूर आणि जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने ४ जुलैपासून उमरेड-कऱ्हांडला पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अभयारण्य गेटच्या क्षेत्राजवळ असलेल्या नवेगाव (साधू) ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र राज्य अभयारण्य गाईड्स युनियन यांनी पर्यटन सुरू केल्यास बाहेरून होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची भीती व्यक्त करीत पर्यटन सुरू करण्याचे निवेदन केले. स्थानिकांचा विरोध पाहता येथील पर्यटन सुरू करण्यास पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी सांगितले.