ऑक्टोबरपासून वन पर्यटन सुरू? जिल्हाबंदी उठल्याने आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 07:52 PM2020-09-03T19:52:25+5:302020-09-03T19:52:55+5:30
सरकारने अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात ई-पास रद्द केले असून जिल्हा प्रवास बंदीही उठविली आहे. यामुळे राज्यातील वन पर्यटन ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे देशात बंद पडलेले वन पर्यटन आता ऑक्टोबरपासून नियमित सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारने अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात ई-पास रद्द केले असून जिल्हा प्रवास बंदीही उठविली आहे. यामुळे राज्यातील वन पर्यटन ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मार्च महिन्यापासून राज्यातील सर्वच वन पर्यटन बंद आहेत. जिल्हा प्रवास बंदीमुळे आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली होती. वन्यजीव प्राधिकरणानेही सर्व प्राणिसंग्रहालये बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने ही टाळेबंदी कायम आहे. मात्र आता सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. यात ई-पासची सक्ती हटविली असून जिल्हा प्रवास बंदीही हटविली आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात प्रवास वाढतील, असा अंदाज आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये वन पर्यटन बंद ठेवले जाते. ते ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. यंदाही १ ऑक्टोबरपासून वन पर्यटन सुरू होण्याची शक्यता आहे. विशेषत: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पही १ तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पावसामुळे ही तारीख पुढे ढकलायची झाल्यास १५ ऑक्टोबरपासून येथील पर्यटन सुरू होऊ शकते.
या सोबतच, पेंच, नागझिरा, मेळघाट येथीलही पर्यटन याच काळात सुरू होण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकल्पांचे संचालक या संदर्भात निर्णय घेणार आहेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे. तथापि ताडोबासह अन्य ठिकाणचे पर्यटन सुरू झाल्यास व शासनाचे निर्णय आल्यास ऑक्टोबरमध्ये तेथील बंदी उठविली जाण्याची शक्यता आहे.
ताडोबातील पर्यटनाच्या आरक्षणासाठी यापूर्वी ई-महा इको टुरिझमची वेबसाईट वापरली जात असे. आता मात्र ताडोबाने स्वत:ची वेबसाइट तयार केली असून त्यावरूनच आरक्षण दिले जाणार आहे. ही तयारी लक्षात घेता नजीकच्या काळात विदर्भातील वन पर्यटन सुरू होणार, असे दिसत आहे.