आरएफओसह वनपाल, सर्व्हेअर निलंबित
By admin | Published: January 25, 2017 02:29 AM2017-01-25T02:29:40+5:302017-01-25T02:29:40+5:30
कोंढाळी वन परिक्षेत्रातील अवैध वृक्षकटाई प्रकरणात संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनपाल, सर्व्हेअर आणि वनरक्षक अशा चौघांना निलंबित करण्यात आले आहे.
अवैध वृृक्षकटाई भोवली : कोंढाळी वन परिक्षेत्रातील घटना
नागपूर : कोंढाळी वन परिक्षेत्रातील अवैध वृक्षकटाई प्रकरणात संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनपाल, सर्व्हेअर आणि वनरक्षक अशा चौघांना निलंबित करण्यात आले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) प्रशांत हुमणे, वनपाल (फॉरेस्टर) आर. वाय. साबळे, सर्व्हेअर व्ही. जी. गुरव आणि वनरक्षक एस. एस. मरसकोल्हे अशी त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
यासंबंधी नागपूरचे उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांना विचारणा केली असता, त्यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे या चारही लोकांविरुद्ध निलंबन कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘लोकमत’ने गत चार दिवसांपूर्वी ‘संरक्षित जंगलावर चालली कुऱ्हाड’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून या अवैध
वृक्षकटाईचा भंडाफोड केला होता. वन विभागाने ‘लोकमत’च्या त्या बातमीची गंभीर दखल घेत, वेगाने चौकशी पूर्ण करीत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध ही कारवाई केली. वन विभागाच्या या कारवाईने सर्वांचे धाबे दणाणले आहे. या संपूर्ण प्रकरणाची हकीकत अशी, कोंढाळी वन परिक्षेत्रातील मूर्ती येथे प्रवीण मन्ने या व्यक्तीची खसरा क्र. १५५/३ ही शेती आहे; शिवाय त्या शेतीलाच लागून वन विभागाचा खसरा क्र. १५४ मधील संरक्षित जंगल आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी १५५/३ मधील झाडे कटाईची वन विभागाकडे परवानगी मागितली होती.
त्यावर कोंढाळीचे आरएफओ प्रशांत हुमणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी न करता, त्या शेतकऱ्याला झाडे तोडण्याची परवानगी दिली.
सोबतच वन विभागाचे सर्व्हेअर व्ही. जी. गुरव यांनीसुद्धा नकाशाची पाहणी न करता खसरा क्र. १५५/३ शेजारी वन विभागाचे कोणतेही जंगल नसल्याचे प्रमाणपत्र दिले. या दोन्ही गोष्टींचा खासगी ठेकेदाराने फायदा घेऊन वन विभागाच्या संरक्षित जंगलातील तब्बल २०० वर सागाच्या झाडांची कत्तल केली. त्या सर्व झाडांची खुल्या बाजारात सुमारे २० ते २५ लाख रुपये किंमत असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाने वन विभाग खडबडून जागा झाला होता.
महिनाभरात दोन घटना
माहिती सूत्रानुसार मागील महिनाभरात कोंढाळी या एकाच वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यापैकी मूर्ती बिटातील घटनेत ही कारवाई झाली आहे. मात्र यापूर्वी येथील शेकापूर-कुंडी या बिटातसुद्धा अशीच अवैध वृक्षतोड झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या घटनेचीसुद्धा स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे वन विभागाच्या या कारवाईने वन अधिकारी व कर्मचाऱ्यांसह खासगी ठेकेदारांना धडकी भरली आहे. काही ठेकेदारांनी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अवैध वृक्ष कटाईचा गोरखधंदा चालविला आहे. मात्र नागपूरचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी आणि उप वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दोषीविरुद्ध तडकाफडकी केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. या दोन्ही वन अधिकाऱ्यांची अतिशय शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून वन विभागात ओळख आहे. शिवाय या कारवाईतून त्यांनी ते पुन्हा सिद्ध करून दाखविले आहे. (प्रतिनिधी)