वणव्यांमुळे वन आणि वन्यजीव भयाच्या सावटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 09:50 PM2021-04-01T21:50:37+5:302021-04-01T21:52:09+5:30
Forests fire जंगलांना दरवर्षी लागणाऱ्या आगी आणि त्यावर कायमस्वरूपी नसलेल्या उपाययोजना यामुळे वन आणि वन्यजीव भयाच्या सावटात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर जंगलांना विविध कारणांनी आगी लागतात. बरेचदा आगीची कारणे सापडतच नाहीत. मात्र यात वन्यजीवांचे आणि पक्ष्यांचे नुकसान होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जंगलांना दरवर्षी लागणाऱ्या आगी आणि त्यावर कायमस्वरूपी नसलेल्या उपाययोजना यामुळे वन आणि वन्यजीव भयाच्या सावटात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर जंगलांना विविध कारणांनी आगी लागतात. बरेचदा आगीची कारणे सापडतच नाहीत. मात्र यात वन्यजीवांचे आणि पक्ष्यांचे नुकसान होते. वनस्पतीही नष्ट होतात. मात्र दरवर्षी घडणाऱ्या या घटना टाळण्यात वनविभागाला यश आलेले नाही.
उन्हाळ्याच्या तोंडावरच जंगलांना आगी लागण्याच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. या काळात तेंदूपत्ता हंगाम सुरू होतो. त्यामुळे कचरा जाळण्यासाठी ठेकेदारांकइून मुद्दाम आगी लावल्या जातात, असा आरोप फार पूर्वीपासून होत आहे. अशा घटना घडल्यावर केवळ गुन्हे दाखल होतात, आरोपी सापडतच नाही. यामुळे वन विभागाचा वचक नसल्यासारखी काही ठिकाणी स्थिती असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडृन होत आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळ, प्रादेशिक वन विभाग आणि वन्यजीव अभयारण्य अशा तीन प्रकारच्या जंगलात वनांची विभागणी होत असली तरी समस्या सर्व ठिकाणी सारख्याच आहेत. या वर्षी जाळ रेषा नियंत्रणासाठी निधी विलंबाने आला. त्याचाही परिणाम कामावर झाला आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर मोहाफुले वेचण्याचा हंगाम सुरू होतो. या वन उपजातून उत्पन्न मिळत असल्याने कुटूंबेच्या कुटूंबे या कामी असतात. तेंदुपत्ता तोडाईसाठी कोवळ्या पानांची गरज असते. आगीनंतर नवी पालवी फुटते. यानंतर झाडावर येणारी कोवळी पाने बिडी तयार करण्यासाठी उपयुक्त असल्याने तेंदूपत्ता ठेकेदारांकडूनच आगींचे प्रकार घडत असल्याचे अनेकदा सांगितले जाते.
वीज वाहिन्यांचे स्पार्किंग
जंगलामधून जाणाऱ्या ११ केव्हीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळेही आगी लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपुरातील अंबाझरी लगतच्या जंगलामध्ये मागील वर्षी दोन वेळा आगीच्या घटना घडल्या होत्या. अलिकडे जानेवारी महिन्यातही या जंगलाला विद्यापीठाच्या मागील बाजूने आग लागली होती. ती पसरत जाऊन जंगलात पोहचल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान झाले होते.
ज्या जंगलात आगी लागतात, तेथील अधिकाऱ्यांना आगीच्या घटनांसाठी जबाबदार धरले जावे. जाळ रेषा आखताना होणाऱ्या दुर्लक्षामुळेही आग रोखली जाऊ शकत नाही. यातील तांत्रिकता तपासली जावी. वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगसारख्या घटनांचीही वन विभागाने दखल घ्यावी.
- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी.