नकली पिस्ताच्या कारखान्यावर धाड
By Admin | Published: January 9, 2016 03:34 AM2016-01-09T03:34:52+5:302016-01-09T03:34:52+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी कारवाई करीत गोळीबार चौक येथे सुरू असलेला नकली पिस्ताचा कारखाना उघडकीस आणला.
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : गोळीबार चौकात सुरू होता कारखाना
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी कारवाई करीत गोळीबार चौक येथे सुरू असलेला नकली पिस्ताचा कारखाना उघडकीस आणला.
भास्कर महादेवराव पवार रा. पटवी मंदिर गल्ली गोळीबार चौक, असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पवार हा आपल्या घरी रंगयुक्त शेंगदाणा किस (नकली पिस्ता) व रंगयुक्त शेंगदाणा उत्पादित करून विक्रीसाठी साठवून ठेवत होता. हा साठा तो सोनपापडी कारखानदारांना विकायचा. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन विभागाला महिती मिळाली. सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) न.रं. वाकोड, अन्न सुरक्षा अधिकारी अखिलेश राऊत व अभय देशपांडे यांनी पवार याच्या घरावर धाड टाकली.
या ठिकाणी शेंगदाण्याला सिंथेटिक कलर करून त्याला पिस्ताप्रमाणे हिरवा रंग लावून तो पिस्ता म्हणून बाजारात कमी किमतीत विकला जात होता. या १५ हजार रुपये किमतीचा १४६ किलो नकली पिस्ताचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेले अन्न पदार्थाचे विश्लेषणास्तव नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
नमुन्याचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. (प्रतिनिधी)