‘अद्रक मार के चाय’ आता विसरा; भाव २०० रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 08:25 PM2023-05-19T20:25:32+5:302023-05-19T20:26:11+5:30
आल्याचे भाव २०० रुपये किलोवर गेल्यामुळे चहाविक्रेत्यांना चहात आले टाकून विकणे परवडेनासे झाले असून, बहुतांश चहा विक्रेत्यांनी चहात आले टाकणे बंद केल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे.
दयानंद पाईकराव
नागपूर : अद्रक (आले) टाकून बनविलेल्या चहाची चव काही निराळीच असते. त्यामुळे चहा पिण्यासाठी टपरीवर गेलेले शौकीन नेहमीच ‘अद्रक मार के चाय देना’ असे फर्मान सोडतात; परंतु आता ‘अद्रक मार के चाय’ असे म्हणण्याची सोय उरलेली नाही. होय, आल्याचे भाव २०० रुपये किलोवर गेल्यामुळे चहाविक्रेत्यांना चहात आले टाकून विकणे परवडेनासे झाले असून, बहुतांश चहा विक्रेत्यांनी चहात आले टाकणे बंद केल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे.
आल्याचा भाव २०० रुपयांवर
नागपुरात आल्याचा भाव २०० रुपयांवर गेला आहे. ठोक बाजारात आल्याचा भाव १६० रुपये आहे; तर किरकोळ बाजारात आल्याचा भाव २०० रुपये किलो झाल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.
... म्हणून वाढले भाव
नागपुरात आल्याची आवक छिंदवाडा, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ आणि बंगळुरवरून होते. परंतु छिंदवाडा, नाशिक, बुलढाणा आणि यवतमाळ येथून आल्याची आवक अतिशय कमी झाली आहे. केवळ बंगळुरूवरून आल्याची आवक होत असल्यामुळे आल्याचे भाव वाढल्याची माहिती कॉटन मार्केट येथील भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.
चहातून आलं गायब
- आलं टाकलेला चहा सर्वांनाच आवडतो. त्यामुळे कोणताही ऋतू असो; चहाशौकीन आलं टाकलेला चहा पिण्याला प्राधान्य देतात. मात्र आल्याचे भावच वाढल्यामुळे चहाविक्रेत्यांना चहात आले टाकणे परवडत नसल्यामुळे चहातून आले गायब झाल्याची चित्र नागपुरात पाहावयास मिळत आहे.
आल्याची आवक घटल्याने दरवाढ
‘आल्याची आवक छिंदवाडा, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ आणि बंगळुरूमधून होते; परंतु सध्या केवळ बंगळुरूमधून आलं येत असून इतर ठिकाणांवरून येणारं आलं बंद झाल्यामुळे ठोक बाजारात आलं १६० रुपये; तर चिल्लर बाजारात आल्याचे दर २०० रुपयांवर गेले आहेत.’
- प्रभाकर काळे, संघटन सचिव, महात्मा फुले भाजी दलाल असोसिएशन
चहात आलं टाकणे परवडेना
‘आल्याचे दर वाढून २०० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे चहात आले टाकणे चहाविक्रेत्यांना परवडेना झाले आहे. त्यामुळे मीसुद्धा चहात आलं टाकणे बंद केले आहे. दरवाढ कमी होताच चहात आलं टाकणार आहे.’
- राजू बिनकर, राजू टी स्टॉल, पंचशील चौक, नागपूर
.........