जखमेवर मलमपट्टी विसरा, थेट कृत्रिम त्वचाच लावा; नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांना यश

By निशांत वानखेडे | Published: October 24, 2024 06:52 PM2024-10-24T18:52:43+5:302024-10-24T18:53:13+5:30

संशोधकांनी बनविली अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा : नागपूर विद्यापीठाच्या संशाेधकांचे यश

Forget dressing the wound, apply the artificial skin directly; Success to the researchers of Nagpur University | जखमेवर मलमपट्टी विसरा, थेट कृत्रिम त्वचाच लावा; नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांना यश

Forget dressing the wound, apply the artificial skin directly; Success to the researchers of Nagpur University

नागपूर : जखम झाली की मलम लावत पट्टी बांधायची असा उपचार वर्षानुवर्षेपासून केला जात आहे. मात्र आता अशी मलमपट्टी करण्यापेक्षा जखमेच्या ठिकाणी दुसरी त्वचाच लावण्याचे संशाेधन नागपूर विद्यापीठाच्या संशाेधकांनी केले आहे. अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा लावल्याने जखम वेगाने बरी हाेईल आणि संक्रमणही वाढणार नाही, असा दावा संशाेधकांनी केला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मॉलिक्युलर बायोलॉजी विभागातील संशोधकांनी अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा शोधून तयार केली आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. दयानंद गोगले आणि लिटूच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. आरती शनवारे यांनी प्रकल्प प्रमुख डॉ. बिपिन लाडे यांच्या मदतीने हे संशोधनकार्य पूर्ण केले आहे. बायोटेक्नोलॉजीचे विद्यार्थी आकाश कांदी यांचाही सहभाग आहे. राजीव गांधी जैविक तंत्रज्ञान (आरजीबीसी) प्रकल्पाअंतर्गत विद्यापीठातील पदव्युत्तर वनस्पती विभागाने जखमांमुळे हाेणारे संक्रमण रोखण्यासाठी व बरे होण्यासाठी अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली नवीन कृत्रिम त्वचा विकसित करण्याबाबत २०१९-२०२० मध्ये संशोधनास सुरुवात केली. यात विद्यापीठाच्या संशाेधकांना क्रांतिकारी यश मिळाले आहे.

कसा करायचा उपयाेग?

जखम झालेल्या जागेवर पट्टीच्या ऐवजी या कृत्रिम त्वचेचा तुकडा लावल्याने जखम सुकेल आणि बरी होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या औषधीय घटकांचा वापर या कृत्रिम त्वचेत करण्यात आला आहे. या त्वचेमुळे जखम झाकली जाईल आणि बरीही होईल. जखम झालेल्या ठिकाणी कमी वेळात नैसर्गिक त्वचा येण्यासही या संशोधनामुळे शक्य होणार आहे. ही त्वचा जैवविघटनशील असल्याने जखमेवरून काढून टाकल्यानंतरही ती आपोआप विघटित होईल आणि त्यातून दीर्घकाळ टिकणाऱ्या कचऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही.

काेणते घटक वापरले?
या नाविन्यपूर्ण संशोधनात सोडियम अल्जिनेट, जिलेटिन, किटोसन आणि अँटीमायक्रोबियल एजंट यांचा वापर करून कृत्रिम त्वचा तयार केली. ज्यामुळे उच्च दर्जाच्या जखमा लवकर बरी होण्याकरिता मदत मिळेल.

नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये
जखमांवर मलमपट्टी करण्याची वर्षानुवर्षीची पद्धत अनेकदा संक्रमण रोखण्यात अपयशी ठरते. कृत्रिम त्वचेमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असून ज्यामध्ये गॅलिक ॲसिड आणि थायमॉल यांचा समावेश आहे. यातील नैसर्गिक गुणधर्म जंतूंना मारत संक्रमण रोखण्यास मदत करते. कृत्रिम त्वचा ही नैसर्गिक त्वचेसारखी दिसू शकते. संशोधकांनी निर्माण केलेली कृत्रिम त्वचा ही नैसर्गिक त्वचे करिता हानिकारक नसल्याचे विविध चाचण्यांमधून दिसून आले.

Web Title: Forget dressing the wound, apply the artificial skin directly; Success to the researchers of Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.