खिडकीवर चावी विसरले, ११ लाखाचे दागिने झाले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 10:49 AM2021-02-11T10:49:38+5:302021-02-11T10:51:02+5:30
Nagpur News मुख्य दाराच्या कुलपाची चावी खिडकीत ठेवून बाहेर गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरातून ११ लाखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी उडविले. ही घटना हुडकेश्वर ठाण्याच्या महालक्ष्मीनगरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्य दाराच्या कुलपाची चावी खिडकीत ठेवून बाहेर गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरातून ११ लाखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी उडविले. ही घटना हुडकेश्वर ठाण्याच्या महालक्ष्मीनगरात घडली.
महालक्ष्मीनगर येथील रहिवासी ज्ञानेश्वर पराते (५८) ३१ जानेवारीला डाक विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी आहे. परिवारात एक मुलगा असून मुलीचे लग्न झाले आहे. मुलगा रविवारी फिरायला गेला आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता पराते महालच्या डाकघरात कामासाठी गेले होते. त्यांनी मुख्य दाराला कुलूप लावून त्याची चावी खिडकीजवळ ठेवली. ते चावी सोबत नेण्याचे विसरले. ते जाताच चोरट्यांनी खिडकीवर ठेवलेल्या चावीने कुलूप उघडून आत प्रवेश केला. बेडरूमच्या आलमारीतून चोरट्यांनी २५ तोळे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख चोरी केले. चोरी केल्यानंतर आरोपींनी मुख्य दार आतून बंद केले व पूजा घरातून फरार झाले. दुपारी ३.३० वाजता पराते घरी पोहोचले. त्यांना चावी दिसली नाही. मुख्य दारही आतून बंद होते. पराते यांनी घराची पाहणी केली असता पूजाघराचा दरवाजा उघडा दिसला. तेथून आत गेल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याबाबत सूचना मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून फिंगर प्रिंट आणि इतर पुरावे गोळा केले. पराते यांच्या घरासमोर मैदान आणि मंदिर आहे. काही दूर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु आरोपी कॅमेऱ्यात कैद झाले नाहीत. चावी हातात लागल्यामुळे आरोपींना चोरी करणे सहज शक्य झाले. आरोपी परिसरातीलच असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. चावी खिडकीवर का ठेवली, अशी विचारणा केली असता पराते यांनी चुकीने राहिल्याचे सांगितले. पोलिसांनी याबाबत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.