सिमेंट रोडच्या चौकशीसाठी समिती गठित करा
By admin | Published: May 9, 2017 02:07 AM2017-05-09T02:07:14+5:302017-05-09T02:07:14+5:30
विकास कामांना आमचा विरोध नाही. परंतु शहरातील सिमेंट रोडच्या गुणवत्तेबाबत आक्षेप घेण्यात आलेले आहेत.
विरोधकांची मागणी : भेगा डांबराने भरण्याच्या जिओटेकेच्या सूचना होत्या का?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकास कामांना आमचा विरोध नाही. परंतु शहरातील सिमेंट रोडच्या गुणवत्तेबाबत आक्षेप घेण्यात आलेले आहेत. काही रोडवरील भेगा डांबराने भरण्यात आलेल्या आहेत. त्या जिओटेकच्या सूचनानुसार संंबंधित कंत्राटदारांनी भरलेल्या आहेत का, काम दर्जेदार होते तर पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार वेस्ट हायकोर्ट रोडवरील गट्टू का बदलण्यात आले, असे प्रश्न निर्माण झाले आहे. सिमेंट रोडची कामे दर्जेदार होण्यासाठी या कामाची तपासणी करण्यासाठी समिती गठित करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.
विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी सिमेंट रोडचा प्रश्न उपस्थित केला. शहरातील सिमेंट रस्ते नागरिकांच्या पैशातून होत आहे. परंतु यात भ्रष्टाचार होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. इंडियन रोड काँग्रेसच्या म्हणण्यानुसार सिमेंट रोड उन्हामुळे प्रसरण व आकुंचन पावतात. यामुळे भेगा पडतात. सिमेंट रोडच्या नमुन्यांची तपासणी जिओटेक संस्थेमार्फत केली जाते. यात कोणत्याही प्रकारची अनियमितता नाही. कामे दर्जेदार होत असल्याचा दावा सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी केला.
सिमेंट रोडला काही ठिकाणी सहा इंचाच्या भेगा गेलेल्या आहेत. हे निकषात बसते का, असा प्रश्न उपस्थित करून दुनेश्वर पेठे यांनी रोडची कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप केला. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार वेस्ट हायकोर्ट सिमेंट रोडचे निकृष्ट ब्लॉक काढण्यात आले आहे. जिओटेक संस्थेकडून नमुन्यांची तपासणी केली जाते अशी माहिती मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
नागपूर शहरात पहिल्या टप्प्यात ३० रोडच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील १२ रोडचे काम पूर्ण झाले असून चार रोडची कामे प्रगतिपथावर आहे. दुसऱ्या टप्प्यात ५९ रोडची कामे करावयाची आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा कालावधी २६ जानेवारी २०१८ पर्यंत आहे. यातील ३३ रोडची कामे प्रगतिपथावर आहे. मे महिन्यातील तापमान, भूमिगत केबलचे नेटवर्क बदलणे, यामुळे कामाला विलंब होत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. सिमेंट रोडच्या प्रकरणात नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी सभागृहात दिले. सिमेंट रोडच्या चर्चेत अन्य सदस्यांनीही सहभाग घेतला.
वाठोडा रिंगरोडवरील स्वामी नारायण मंदिर येथील पूल व रोडचे रुं दीकरणाचे काम करताना पाणी पुरवठ्याच्या लाईन तोडण्यात आल्यात. यात महापालिके चे १६ लाखांचे नुुकसान झाले. परंतु महापालिकेने संबंंधित कंत्राटदारांवर कारवाई केली नसल्याचा मुद्दा धर्मपाल मेश्राम यांनी उपस्थित केला.
काही भागात दिवसाआड पाणी
शहरातील नागरिक ांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी २४ बाय ७ योजना राबविली जात आहे. परंतु शहरातील अनेक वस्त्यांना आजही एक दिवसाआड पाणी मिळते. कुठे २० मिनिटे तर काही वस्त्यांना अर्धातास पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे संजय महाकाळकर यांनी निदर्शनास आणले. यावर तातडीने उपायोजना करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
राज्य सरकारकडून ९५ कोटी मिळाले
शहरातील नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. परंतु निधीची अडचण होती. आता शासनाकडून या योजनेसाठी ९५ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. जलप्रदाय विभागाची बैठक आयोजित करून निर्धारित कालावधीत कामे पूर्ण होतील अशी ग्वाही आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली.
लोकमतने वेधले लक्ष
शहरातील निकृष्ट दर्जाचे सिमेंट रोड, संथ काम व होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या संदर्भात लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित करून सर्वप्रथम महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले होते. शासन दरबारी हा प्रश्न लावून धरला. यातूनच जनमंचने पब्लिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. अखेर लोकमतच्या वृत्त मालिकेची दखल घेत महापालिका प्रशासनाने चौकशी सुरू केली. सोमवारी सभागृहातही सदस्यांनी सिमेंट रोडचा मुद्दा लावून धरीत चौकशीसाठी समिती गठित करण्याची मागणी केली.