‘चौकशी समिती’च्या निर्मितीमुळे पोलिसांच्या तपासाला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:15 AM2021-01-13T04:15:37+5:302021-01-13T04:15:37+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - १० तान्हुल्यांना मृत्यूच्या जबड्यात पोहचविणाऱ्या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न देशभरातून विचारला ...

The formation of an 'inquiry committee' has curbed the police investigation | ‘चौकशी समिती’च्या निर्मितीमुळे पोलिसांच्या तपासाला लगाम

‘चौकशी समिती’च्या निर्मितीमुळे पोलिसांच्या तपासाला लगाम

Next

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - १० तान्हुल्यांना मृत्यूच्या जबड्यात पोहचविणाऱ्या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न देशभरातून विचारला जात आहे. सर्वांनाच या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या पोलीस यंत्रणेवर मात्र ‘चौकशी समिती’च्या निर्मितीमुळे लगाम लावल्यासारखा झाला आहे. दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेने आग आणि लहानग्यांच्या मृत्यूच्या दोन वेगवेगळ्या बाबींची सरमिसळ करून वेळ मारून नेण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

१० चिमुकल्यांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाल्याची सुन्न करून सोडणारी ही घटना शनिवारी पहाटे घडल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त झाली. ही दुर्घटना कशी घडली आणि या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे, ते शोधून काढण्याच्या आणि दोषीवर कडक कारवाई करण्याच्या बाता घटना उघडकीस आल्यापासून सुरू झाल्या आहेत. घटनेची चौकशी करण्यासाठी एक समितीही निर्माण करण्यात आली आहे. ही समिती जो चौकशी अहवाल देईल, त्यानुसार दोषी ठरविले जातील, असे सांगून आता या प्रकरणाच्या अनुषंगाने उफाळलेला रोष दाबण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.

हीच घटना खासगी रुग्णालयाच्या संबंधाने घडली असती तर आतापावेतो त्या रुग्णालयाचे संचालक, डॉक्टर, नर्सेस आणि अन्य कर्मचाऱ्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या असत्या. तेच नाही तर त्यांच्यासोबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनाही निलंबित करून घरी पाठविण्यात आले असते. सरकारी (सामान्य) रुग्णालयातील १० जन्मदात्यांच्या काळजाचा तुकडा क्रूरपणे मृत्यूच्या जबड्यात ढकलण्याच्या या गुन्ह्यात लालफितशाहीतील अनेकांचे हात आहे. केवळ भंडाराच नव्हे तर नागपूरपासून मुंबईपर्यंतची मंडळीही यामुळे गोत्यात येऊ शकते, हे ध्यानात आल्यामुळे या मंडळींवर कारवाईचा चाबूक पडू नये म्हणून पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठीच आग आणि बालकांचे मृत्यू या दोन गंभीर गुन्ह्यांची सरमिसळ केली जात आहे. विविध पोलीस अधिकारी आणि कायद्याची जाण असणारांच्या मते आग कशी लागली आणि त्याला कोण दोषी, हा एक भाग आहे. ही आग टाळता आली असती मात्र त्यासंबंधाने उपाययोजना करायला हव्या होत्या त्या केल्या नाही, त्यासाठी कोणकोण दोषी आहेत, याचा तपास आणि गुन्ह्याची नोंद हा दुसरा भाग, तिसरे म्हणजे कोणत्याही ठिकाणी कधीही शॉर्टसर्किट होऊ शकते, हे गृहित धरून तसे झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची व्यवस्था ठेवायला हवी होती. या नवजात चिमुकल्यांचे कधीही कोणतेही दुखणे निघू शकते अन् त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, याची डॉक्टर, नर्सेसना चांगली कल्पना असते. त्यात ऑक्सिजनचे सिलेंडर असल्याने आगीचा भडका उडू शकतो, हे ध्यानात असूनही तेथे मनुष्यबळ आणि आगीवर तातडीने नियंत्रण मिळविणारी अद्ययावत उपकरणे ठेवण्यात आली नाही, हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे संबंधितांवर ३०४ (अ) किंवा ३०४ (२) अन्वये गुन्हा दाखल व्हायला हवा. मात्र, पोलिसांनी घटनेला ४० तासांपेक्षा जास्त अवधी झाला असताना केवळ एडी (अकस्मात मृत्यू) अशी नोंद केली आहे.

---

चाैकशी सुरू आहे...।

विशेष म्हणजे, या घटनेची चौकशी करण्यासाठी अवघी तपासयंत्रणाच भंडाऱ्यात कामी लागली आहे. मात्र, गृहमंत्री, मुख्यमंत्री अन् विधानसभा अध्यक्षांसह अनेकांनी भेटी देऊन ‘उच्चस्तरीय चौकशी’चे सूतोवाच केल्याने पोलिसांच्या चौकशीला लगाम बसल्यासारखा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि भंडाऱ्याच्या ठाणेदारांनी ‘चाैकशी सुरू आहे’ एवढेच उत्तर पाठ करून ठेवले आहे. अधिक बोलते केले असता पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वात एक चमू गठित करण्यात आली असून ती या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.

----

‘‘शॉर्ट सर्किटच्या (विजेच्या) ठिकाणी (जवळ) ऑक्सिजनचे सिलिंडर ठेवल्यास आगीचा भडका उडू शकतो, ही बाब प्रशासनाने लक्षात घ्यायला हवी. या साध्या बाबीकडे जर संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर तो सकृतदर्शनी हलगर्जीपणाचा पुरावा ठरतो’’.

-ॲड. उज्ज्वल निकम, सुप्रसिद्ध विधीज्ज्ञ

---

Web Title: The formation of an 'inquiry committee' has curbed the police investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.