बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरेंचा शिवसेनेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:52+5:302021-06-28T04:07:52+5:30
नागपूर : बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना संपर्क प्रमुख आ.दुष्यंत चतुर्वेदी ...
नागपूर : बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना संपर्क प्रमुख आ.दुष्यंत चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी त्यांच्यासमवेत बसपाचे अनेक कार्यकर्तेदेखील शिवसेनेत आले.
सुरेश साखरे यांनी बहुजन समाज पक्ष अर्थात बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. तीन दशके ते बसपासोबत होते. गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दादरा नगर हवेली येथील प्रदेश प्रभारी म्हणूनदेखील जबाबदारी सांभाळली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते उत्तर नागपूर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्रात पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर साखरेंना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अखेर त्यांनी रविवारी सेनेत प्रवेश केला.
मागील दीड वर्षांपासून मी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम पाहत आहे. त्यांचे कर्तृत्व लक्षात घेता मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे साखरे यांनी सांगितले. साखरे यांच्यासमवेत बसपाचे माजी प्रदेश सचिव त्रिभुवनपाल तिवारी,बहुजन विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश संयोजक नादकिशोर इंगोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला.