नागपूरचे माजी महापौर अटलबहादूरसिंग यांना ‘क्रीडा महर्षी’ सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 04:26 PM2018-05-24T16:26:44+5:302018-05-24T16:26:58+5:30
अनुभवी क्रीडा संघटक, माजी महापौर अटलबहादूरसिंग यांचा नागपूर क्रीडा महर्षी म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरच्याहस्ते सन्मान होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २६ मे रोजी सायंकाळी यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या सोहळ्यात पाच लाख रुपये, रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती आयोजन समितीचे संयोजक संदीप जोशी यांनी पत्रकारांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनुभवी क्रीडा संघटक, माजी महापौर अटलबहादूरसिंग यांचा नागपूर क्रीडा महर्षी म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरच्याहस्ते सन्मान होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २६ मे रोजी सायंकाळी यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या सोहळ्यात पाच लाख रुपये, रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती आयोजन समितीचे संयोजक संदीप जोशी यांनी पत्रकारांना दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या विविध खेळातील २० क्रीडा धुरिणांचाही प्रत्येकी ५१ हजार रोख,शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सचिनच्याहस्ते सत्कार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रणजी करंडक प्रथमच जिंकणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघाला देखील सचिनच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
शहर आणि जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त १२० खेळाडू आणि संघटकांना देखील यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविले जाईल, असे जोशी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती राहणार आहे.
ज्या २० क्रीडा धुरिणांचा सत्कार होणार आहे त्यात, भाऊ काणे अॅथ्लेटिक्स, एसजे अॅन्थोनी मॅरेथॉन, सलिम बेग फुटबॉल, डॉ, विजय दातारकर खो-खो, डॉ. दर्शन दक्षिणदास टेनिस,अरविंद गरुड बास्केटबॉल, यशवंत चिंतले गुरुजी कॅरम,बाबा देशपांडे स्केटिंग, लिखिराम मालविय जलतरण, सुनील हांडे व्हॉलिबॉल, सीडी देवरस बॅडमिंटन, त्रिलोकीनाथ सिध्रा हॉकी, अनुप देशमुख बुद्धिबळ, शरद नेवारे कबड्डी, अविनाश मोपकर टेबल टेनिस, सुहासिनी वैद्य गाडे महिला क्रिकेट, सीताराम भोतमांगे कुस्ती, दिनेश चावरे शरीरसौष्ठव आणि विजय मुनिश्वर पॅरा स्पोर्टस आदींचा समावेश आहे.
निवड समितीत एसजेएएन अध्यक्ष किशोर बागडे, सचिव संदीप दाभेकर, संदीप जोशी, पीयूष अंबुलकर, डॉ. पद्माकर चारमोडे आणि मनपा क्रीडा सभापती नागेश सहारे आदींचा समावेश होता.