माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 09:10 PM2020-06-06T21:10:19+5:302020-06-06T21:12:12+5:30
नागपूरकर माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे मुंबई येथे आजारपणामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. मुनघाटे यांनी शालेय व विधी पदवीचे शिक्षण नागपूरमधून घेतले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकर माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे मुंबई येथे आजारपणामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
मुनघाटे यांनी शालेय व विधी पदवीचे शिक्षण नागपूरमधून घेतले होते. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ते गेल्या दोन दशकापासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत होते. दरम्यान, त्यांनी फौजदारी, दिवाणी व नोकरीसंदर्भातील अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली. अनेक पीडित पक्षकारांना न्याय मिळवून दिला. मृत्यूपूर्वी त्यांनी कोरोनाग्रस्त ८२ वर्षीय पक्षकाराला चांगल्या उपचाराकरिता मदत केली. त्यामुळे तो रुग्ण ठणठणीत बरा झाला. त्यांनी जीवनभर असाच सेवाभाव जपून समाजापुढे आदर्श निर्माण केला. त्यांच्या निधनामुळे विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन लहान भाऊ, बहीण व बराच मोठा आप्त व मित्रपरिवार आहे.