नागपुरात माजी आमदाराच्या बंगल्यात धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:04 PM2019-05-25T23:04:46+5:302019-05-25T23:11:17+5:30
माजी आमदार आशिष देशमुख यांच्या बंगल्यात झालेल्या धाडसी चोरीचा सदर पोलिसांनी अवघ्या दोन तासात छडा लावला. चोरट्याला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी आमदार आशिष देशमुख यांच्या बंगल्यात झालेल्या धाडसी चोरीचा सदर पोलिसांनी अवघ्या दोन तासात छडा लावला. चोरट्याला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले.
देशमुख यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘बरकत’ बंगला आहे. आयुषी आशिष देशमुख (वय ४३) यांनी त्यांचे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने गुरुवारी दुपारी १.३० वाजता बेडरूमच्या बाजूला असलेल्या ड्रेसिंग टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवले. शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता त्यांनी ड्रावर उघडून बघितले तेव्हा त्यात त्यांना दागिने दिसले नाही. त्यांनी आजूबाजूचे सर्व ड्रावर, लॉकर तपासले. मात्र दागिने काही मिळाले नाही. त्यामुळे कुटुंबीयांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी शनिवारी सकाळी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बंगल्यात दुसऱ्या व्यक्तीचे शयनकक्षापर्यंत येणे शक्य नसल्याने घरातीलच नोकरापैकी कुणीतरी ही चोरी केली असावी, असा संशय आयुषी यांनी व्यक्त केला. ठाणेदार महेश बनसोडे यांनी तक्रार मिळताच धावपळ सुरू केली. देशमुख यांच्या घरी किती आणि कोण कोण काम करतात, त्या सर्वांनाच ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली. यापैकी बंगल्यात साफसफाईचे काम करणारा सागर प्रकाश बावणे (वय २२, रा. दसरा रोड, महाल) याने चोरीची कबुली दिली. त्याने तो ऐवज स्वत:च्या घरात दडवून ठेवल्याचेही पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लगेच त्याला घेऊन त्याचे घर गाठले. सागरने त्याच्या घरात एका ठिकाणी हे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने लपवून ठेवले होते. ते जप्त करून पोलिसांनी त्याला अटक केली.
शानशौकीन करण्यासाठी चोरी
गरिबीत जगणाऱ्या सागरच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या सागरला त्याचे मित्र, आजूबाजूची मंडळी शानशौकीनने जगत असल्याने त्यालाही मौजमजा करण्याची इच्छा होती. मजुरीच्या पैशातून हे शक्य नसल्याचीही त्याला खात्री पटली होती. गुरुवारी बंगल्यात साफसफाई करताना त्याला ड्रेसिंग टेबलचे ड्रावर उघडे दिसले. सहज उघडले असता त्यात हिरे आणि सोन्याचे दागिने दिसले. त्यामुळे त्याची मती फिरली आणि त्याने ही चोरी केली. महिनाभरापूर्वीच तो देशमुख यांच्याकडे कामाला लागला होता, असे पोलीस सांगतात.