माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 07:51 PM2019-06-01T19:51:19+5:302019-06-01T20:53:42+5:30

 जनसामान्यांचा नेता रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हजारे यांच्या निधनाची माहिती कळताच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या गांधी वॉर्ड येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

Former MLA Pandurang Hazare passes away | माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे निधन

माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देसामान्यांचा नेता हरविला 

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर (रामटेक) :  जनसामान्यांचा नेता रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हजारे यांच्या निधनाची माहिती कळताच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या गांधी वॉर्ड येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. हजारे यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, दोन मुले विनोद व सुनील, दोन मुली हेमलता व मंगला असा आप्त परिवार आहे. 
 हजारे यांनी दोनवेळा विधानसभेत तर एकवेळा विधान परिषद सदस्य म्हणून रामटेकचे प्रतिनिधित्व केले आहे. रामटेक हा काँग्रेसचा गड असताना विरोधी पक्षाचे पहिले आमदार म्हणून हजारे निवडून आले होते. १९८९ साली जनता दलाच्या तिकिटावर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना रामटेक लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. त्यांचा केवळ ३४ हजार ४७० मतांनी पराभव झाला होता.
१८ जानेवारी १९२८ रोजी आंबाडी, ता.कुही येथे पांडुरंग हजारे यांचा जन्म झाला होता. त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून इंटर्नपर्यंत शिक्षण घेतले. रामटेकच्या गांधी चौकात १९५२ ते ८६ पर्यंत हजारे यांचे हॉटेल होते. ते हॉटेलवाले हजारे म्हणूनच परिचित होते. शेतीकडे त्यांचे विशेष लक्ष होते. १९७२ साली ते राईस मिलच्या व्यवसायाकडे वळले. बापूजी अणेंच्या मार्गदर्शनात १९५७ साली हजारे यांनी राजकारणात प्रवेश केला. ते वेगळ्या विदर्भाचे खंदे समर्थक होते. त्यामुळे जांबुवंतराव धोटे यांच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात ते सक्रियतेने सहभागी होते. १९६७ साली त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार गुंडेराव महाजन यांच्याविरोधात पहिली  निवडणूक नाग विदर्भ समितीकडून लढविली, परंतु ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला. निवडणूक जिंकेपर्यंत लढत राहिले. जनता दलाच्या तिकिटावर ते १९८४ आणि १९८९ साली विधानसभा निवडणूक जिंकले. एकवेळा त्यांना विधान परिषदेमध्येदेखील भाजपाकडून पाठविण्यात आले. खासदारकीसाठी रामटेक लोकसभा मतदार संघातूनही ते लढले. त्यामध्ये त्यांची माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, तेजसिंहराव भोसले, चित्रलेखा भोसले आणि सुबोध मोहिते यांच्याशी लढत झाली. 
१९९० साली त्यांनी जनता दलाला रामराम करीत बनवारीलाल पुरोहित यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. १९९१ साली भाजपच्या तिकिटावर तेजसिंहराव भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढले. यातही त्यांचा पराभव झाला. 

Web Title: Former MLA Pandurang Hazare passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.