‘त्या’ माजी सैनिकाची हत्याच : दोरीने गळा आवळून संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 08:44 PM2019-05-18T20:44:42+5:302019-05-18T20:45:51+5:30
माजी सैनिक भाऊराव गोंडबा मेश्राम यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तसा निष्कर्ष व्यक्त केला आहे. मूळचे इंदोरा येथील राहणारे भाऊराव यांचा मृतदेह बुधवारी संशयास्पद स्थितीत घिवारी शिवारातील नाल्यात आढळला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा राहुल याने वडिलांचा घातपात झाल्याचा आरोप केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (मौदा) : माजी सैनिक भाऊराव गोंडबा मेश्राम यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तसा निष्कर्ष व्यक्त केला आहे. मूळचे इंदोरा येथील राहणारे भाऊराव यांचा मृतदेह बुधवारी संशयास्पद स्थितीत घिवारी शिवारातील नाल्यात आढळला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा राहुल याने वडिलांचा घातपात झाल्याचा आरोप केला होता.
याप्रकरणी तपासानंतर अरोली पोलिसांनी पाच आरोपींना शुक्रवारी ताब्यात घेतले. संतोष सेजुसिंग सेंगर (४३), आशिष ऊर्फ सोनू सेजुसिंग सेंगर (३४), रामसिंग ओमकारसिंग गहेरवार (६४), गणेश भाऊराव मरकाम (३२), वासुदेव उरकुडा गजाम (४५) सर्व रा. इंदोरा, अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीवर खुनाचा तसेच पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून हत्येसाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे. शनिवारी या पाचही आरोपींना कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश नेहा पाटील यांच्या न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली.
मृत भाऊराव सैन्यात होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांना घिवारी (इंदोरा) येथे शासनाकडून शेतजमीन मिळाली होती. गुरुवारी (दि.९ रोजी) ते नागपूर येथून इंदोरा येथे बहिणीकडे आले होते. १० मे रोजी सकाळी ९ वाजता शेतात गेले होते. शिवारात आरोपी संतोष सेंगर याचे शेत आहे. शेतातच त्याचे घर आहे. आरोपींनी ११ वाजताच्या सुमारास भाऊराव यांना बोलविले होते. नायलॉन दोरीने त्यांचा गळा आवळला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, नंतर त्यातील काही आरोपी नागपूरला गेले. दोन दिवस मृतदेह घरातच पडून होता. दि.१२ रोजी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पाचही आरोपींनी भाऊरावचा मृतदेह नाल्यात फेकून दिला होता.
जेसीबीने खड्डा खोदून मृतदेह गाडणार होते
दोन दिवस मृतदेह घरात ठेवल्यानंतर जेसीबीच्या साह्याने शेतात खड्डा करून तो पुरण्याचा आरोपींचा बेत होता. परंतु जेसीबीचा विश्वसनीय चालक मिळाला नसल्याने त्यांनी बेत बदलला. भाऊराव मेश्राम हे मूळचे इंदोरा येथील रहिवासी होते. सैन्यात दाखल झाल्यानंतर पत्नीच्या प्रकृतीच्या कारणावरुन ते नागपूरला राहण्यासाठी गेले होते. इंदोरा येथे त्यांचा नियमित संपर्क होता.