माजी विद्यार्थ्याने दिली अनोखी भेट! मेडिकल कॉलेजमधील तीन एकर उद्यानाचा करणार कायाकल्प
By सुमेध वाघमार | Published: May 23, 2023 07:09 PM2023-05-23T19:09:30+5:302023-05-23T19:10:03+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त याच महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थ्याने अनोखी भेट दिली आहे. डॉ. प्रमोद गिरी यांनी, महाविद्यालयातील तीन एकरांची बाग सुशोभित करण्याचे ठरवले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे माजी विद्यार्थी पुढे येऊन महोत्सवाची एक-एक जबाबदारी घेत आहेत. यातीलच एका माजी विद्यार्थ्याने अधिष्ठाता कार्यालयासमोरील तब्बल ३ एकरचे उद्यान फुलविण्याची जबाबदारी घेतली आहे. ही बाग झाड-फुलांनी बहरली तर असेलच सोबतच येथील मोकळ्या वातावरणात बसून अभ्यास करण्याची, शिक्षक-विद्यार्थी एकत्र येऊन चर्चा करण्याचीही विशेष व्यवस्था असणार आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मेंदू शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व न्युरॉन हॉस्पिटलचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद गिरी त्या माजी विद्यार्थ्याचे नाव. मेडिकलचा परिसर २०० एकर परिसरात पसरला आहे. चार मोठी उद्याने हे या महाविद्यालयाचे वैशिष्ट आहे. जुन्या विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या आठवणींच्या कप्प्यात आजही अधिष्ठाता कार्यालयासमोरील ओवल गार्डन आहे. अंडाकृती आकारातील या उद्यानात पूर्वी थुईथुई करणारे कारंजे, चंदनाचे वृक्ष, विविध फुलांची झाडे हे आकर्षण होते. दरम्यानच्या काळात या उद्यानकडे दुर्लक्ष झाल्याने ओसाड पडले. परंतु आता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने का होईना या उद्यानाला नवे रुप येणार आहे.
-गुरूकूल कन्सेप्टवर आधारीत उद्यान
डॉ. गिरी म्हणाले, एकाच जागी बसून तासनतास अभ्यास करणाऱ्या विशेषत: वैद्यकीय विद्यार्थ्याला कंटाळा येणे साहजिकच आहे. तो घालविण्यासाठी मन रमण्यासाठी, बागेत बसून उभ्यास करता यावा, शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र बसून एखाद्या विषयावर चर्चा करावी यासाठी गुरुकूल कन्सेप्टवर आधारीत या उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे.
-विविध जातीची झाडे, फुले ठरणार आकर्षण
या उद्यानात विविध जातींची झाडे, फुलांचे ताटवे आकर्षण असणार आहे. या शिवाय, छोटे-छोटे शेड काढून तिथे सकाळी योगा, दुपारी शैक्षणिक चर्चा तर सायंकाळी गप्पागोष्टी करता येईल.
- साडे तीन महिन्यात उद्यानाचा कायापालट
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वात कॉलेजचा अमृत महोत्सव डिसेंबर महिन्यात आहे. त्या पूर्वी म्हणजे, पुढील साडे तीन महिन्यात या उद्यानाचा कायापालट करायचा आहे. जवळपास ३० लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. मेडिकलने मला घडविले त्याची वेळोवेळी परतफेड करत आलो आहे, त्यात ही छोटीशी भेट असल्याचे डॉ. गिरी म्हणाले.
-माजी विद्यार्थ्यांचा पुढाकाराने मेडिकलचा कायापालट
मेडिकल कॉलेज १९४७ पासून गुणवत्ताप्राप्त शिक्षक देत आहे. हे शिक्षक जगभरात आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा व अनुभवाचा फायदा रुग्णांसोबत वैद्यकीय विद्यार्थ्यांना होत आहे. अमृत महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी पुढे येऊन स्वत:हून वेगवेगळ्या कामाची जबाबदारी घेत आहे. उद्यानासोबतच क्लास रूम, सभागृह याचाही कायापालट होणार आहे.
-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल